Kolhapur Rain : कोल्हापूर शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. शहर आणि आसपासच्या परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. वीजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावल्याने पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. जोरदार पावसाने अनेक भागातील बत्तीही गुल झाली.  


कालपासून शहरामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांकडून देखावे पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहेत. मात्र, आज आलेल्या अचानक पावसाने तयारीवर चांगलेच पाणी फेरले आहे. शहरामध्ये सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. त्यानंतर ढग दाटून आल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसाने सगळीकडे पाणी करून टाकले. 


कोल्हापूर जिल्ह्यात दोन तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस


कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये अनियमित पावसाचा खेळ सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी करवीर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता. अनेक ठिकाणी तासभर कोसळलेल्या प्रलयकारी पावसाने नाले दुथडी भरून वाहू लागले होते. आजरा तालुक्यातही त्याच पद्धतीने पाऊस झाला होता. 


पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा


दरम्यान, गणपती विसर्जनाच्या वेळी महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) जिल्हा आणि नागरी प्रशासनाला सतर्क केले आहे. हवामान विभागाने नागरिकांनाही विसर्जनाच्या दिवशी योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 


IMD ने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला आहे. या कालावधीत गडगडाटी पाऊस तसेच 30 ते 40 ताशी वेगाने वादळी वारे वाहतील. पुणे आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसह राज्यातील घाटमाथ्यांवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस, गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, परभणी यासह इतर अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 


कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या चारही उपविभागांमध्ये सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात पाऊस 7 ते 10 सप्टेंबर या कालावधीत पाऊस होण्याची शक्यता आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या