Kalyan Dombivali Water Cut: ऐन उन्हाळ्यात  कल्याण - डोंबिवलीच्या पाणीपुरवठ्याबाबत  (Kalyan Domibvli Water Cut News) मोठी बातमी समोर आली आहे. पुढील तीन महिने  येत्या सोमवारी  आणि मंगळवारी  पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.  त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन  विभागातील नागरिकांना केले आहे. 


डोंबिवलीचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे.  शासन आदेशावरुन कल्याण डोंबिवली पालिकेने कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा सोमवार, मंगळवारी 24 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री 12 ते मंगळवारी रात्री 12 या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिकेला विविध जलस्त्रोतांमधून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार  आहे. पुरेसा पाऊस पडेपर्यंत बारवी धरणातील पाणीसाठा समप्रमाणात असावा. कल्याण, डोंबिवली शहरांची पाण्याची तहान येत्या तीन महिन्याच्या कालावधीत काटकसर न करता भागवता यावी या उद्देशाने शासन आदेशावरुन कल्याण डोंबिवली पालिकेने कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा येत्या सोमवार आणि मंगळवारी 24  तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अलनिनो या समुद्र प्रवाहाच्या प्रक्रियेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे धरणांमधील आत्ताची पाण्याची उपलब्धता पाहता शहरांना ऑगस्ट अखेरपर्यंत नियमित पाणी पुरवठा करताना 32 टक्के पाण्याची तूट येण्याची शक्यता  आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी ठाणे पाटबंधारे विभागाने उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी 9 मे पासून कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा दर सोमवार, मंगळवार येत्या तीन महिन्यांपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे


उल्हास नदीवरील बारावे, मोहिली, नेतिवली, टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण पूर्व, पश्चिम, शहाड, वडवली, टिटवाळा, मांडा, आंबिवली, डोंबिवलीला नेतिवली केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.


पाणी जपून वापरण्याचे आवाहन


कल्याण डोंबिवली महानगरपालिका भागातील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. पाणी कपातीच्या कालावधीत कल्याण डोंबिवलीकर नागरिकांची गैरसोय होणार आहे. पाणी काटकसरीने वापरुन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.


पाण्याची मागणी वाढली


राज्यात उन्हाचा चटका वाढतोय, त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढू लागली आहे. त्यातच पाण्याची पाणीपातळी घसरत आहे. बोअरवेल आणि विहिरीतील पाणी देखील कमी होत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच अनेक भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात याचे सर्वाधिक परिणाम जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात आता पाण्याच्या टँकरची मागणी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.