सांगली : सांगली जवळील हरिपूर मधील बागेतील गणपती मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून, गणपतीचे चांदीचे दागिने आणि पूजा साहित्य लंपास केले आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पहाटे गणपतीच्या पूजेसाठी आलेल्या पुजाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकारआला. यानंतर त्यांनी याची माहिती तात्काळ मंदिर प्रशासन आणि पोलिसांना दिली.

चोरट्यांनी गाभाऱ्यातल्या लोखंडी तिझोरीतील चांदीचे किरीट, अभिषेक पात्र, तांब्या-ताम्हण, चांदीचा उंदीर यांसह गणपतीचे साडेचार किलो चांदीचे दागिने आणि इतर पूजा साहित्य  लांबवले.
दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. चोरटयांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाचीही मदत घेतली आहे.