सिंधुदुर्ग : पत्रकारांना निवृत्ती वेतन लागू करण्यासाठी गेल्या अधिवेशनात सरकारने 15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे वर्ग करण्यात आला असून, येत्या 8 ते 15 दिवसांत याबाबत शासन निर्णय काढण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गात दिली. यासोबतच नवीन जाहिरात धोरण, पत्रकार संरक्षण कायदा आदी मागण्यांबाबतही सरकार सकारात्मक आहे, असेही ते म्हणाले.

सिंधुदुर्गात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवन इमारतीचे भूमिपूजन केसरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सिंधुदुर्गात साडेचार कोटी रुपये खर्चून स्मारक आणि पत्रकार भवन उभारण्यात येत आहे.

ते राज्यातील पत्रकारांचे प्रेरणास्थान होईल.  कमीत कमी कालावधीत या पत्रकार भवनाची उभारणी केली जाईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात येणारे बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व पत्रकार भवन भव्य आहे. कमीत कमी वेळात ही भव्य इमारत उभी रहावी अशी अपेक्षा आहे. तर सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन हे राज्यात आदर्शवत ठरेल, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.