अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार रोहिदास दातीर यांची अपहरण करून निर्घृण हत्या झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रोहिदास दातीर यांची हत्या का झाली याची याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. 


अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील पत्रकार व  दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर आपल्या दुचाकीवर घराकडे जात असताना स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांची काल दुपारी अपहरण केल्याची घटना घडली होती. राहुरी पोलीस ठाण्यात रोहिदास दातीर यांच्या पत्नीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी आणि गाडीचा शोध सुरू केला होता. मात्र मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास रोहिदास दातीर यांचा कॉलेज रोडला मृतदेह आढळला आहे. डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसतं आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत आरोपींचा शोध सुरू केला आहे..


रोहिदास दातीर यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक घटनांना वाचा फोडली होती. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. काही प्रकरणांचा खटला औरंगाबाद येथील न्यायालयात प्रलंबित आहे. यातील प्रकरणातूनच त्यांचे अपहरण आणि हत्या झाल्याची चर्चा सुरु आहे.