मुंबई: निधी वाटपाच्या संदर्भात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवरच नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षातील मोजक्या वरिष्ठ नेत्यांनाच निधी मिळाल्याची जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली. विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जर आपल्याच पक्षातील सर्व आमदारांना समसमान निधी वाटप होत नसेल तर तो निधी घेऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे


आपल्याच कळपातील काही जणांना निधी मिळते आणि काही जणांना एक रुपया सुद्धा जर निधी मिळत नसेल तर सरकार विरोधात लढाई लढायची कशी? असा जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जर काँग्रेस या संदर्भात कोर्टात जात असेल तर मीही कोर्टात जाईन असं जितेंद्र आव्हाड यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितलं. 


अजित पवारांवर हल्लाबोल


जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पद हवे होते. सत्तेत आल्यानंतर देखील सर्व पदं त्यांनाच हवी होती. त्यांच्याच मान्यतेने इतरांना पदं दिली गेली. त्यामुळे, सर्व जे काही करायचं ते अजित न करायचं विश्वास दाखवणे शरद पवार यांची सर्वात मोठी चूक ठरली. उपमुख्यमंत्री केलं, विरोधी पक्षनेते केलं, पक्षात काही निर्णय घ्यायचा आहे तर अजित पवारच घेतील ही बाब सर्वांना माहिती आहे. फक्त कोणी बोलत नाही आणि मी बोलण्याचा धाडस करतो," असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.


अजित पवार यांना विरोधी पक्ष नेते करावे यासाठी जे आमदारांच्या सही असणारे पत्र होते, त्यावर सर्वच आमदारांनी सही केली नव्हती. अजित पवार यांनी काही आमदारांना एका पत्रावर सही करायला लावली आणि ते पत्र अजित पवार यांना विरोधी पक्षनेते करावे यासाठी शरद पवार यांना देण्यात आले. त्या पत्रावर माझी सही नव्हती, त्यामुळे सर्व आमदारांनी पत्रावर सही केली असं म्हणणं उचित नाही, असेही आव्हाड म्हणाले. 


अजित पवारांनी पक्षात कोणालाच मोठं होऊ दिले नाही अशी टीका करत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी देखील मला विरोधी पक्षनेते करावे असे एक पत्र शरद पवार यांना दिलं होतं. अजित पवार यांना विरोधी पक्षनेते करावं यासाठी जे काही पत्र दिले, त्यावर केवळ अठरा-एकोणीस लोकांच्या सह्या होत्या. त्या काळात केवळ नऊ जणचं सर्व पदांसाठी हकदार होते. आयुष्यात दुसरी पिढी कधी वरती आलीच नाही. राजकारणात नवीन पिढी आली पाहिजे. शरद पवार नंतर तुम्ही राजकारणात आलात, कारण शरद पवारांनी तुम्हाला आणलं. परंतु, तुम्ही कोणाला राजकारणात आणलं सांगावं, केवळ मी आणि मी हेच तुम्ही केलं. पक्षात माझ्याशिवाय कोणी नाही एवढेच तुम्ही केलं, असा आरोप आव्हाड यांनी केला. तसेच, 2019 साली जे पत्र चोरण्यात आलं होतं, ते राष्ट्रवादीच्या कार्यालयातील गरजे नावाच्या लिपिकाने चोरले होते. तेच पत्र अजित पवार यांना नेऊन देण्यात आले. त्यावर 54 आमदारांच्या सह्या होत्या असेही आव्हाड म्हणाले. 


ही बातमी वाचा: