Jitendra Awhad On Ram : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar) शिबिरात प्रभू श्रीराम (Prabhu Ram) यांनी वनवासात मांसाहार केल्याचे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले. मात्र, त्यांनी केलेल्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आव्हाडांविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. तर, दुसरीकडे आव्हाड यांना धमकी देण्यात येत आहे. मात्र, आव्हाड यांनी धमक्या देणाऱ्यांना समोरासमोर बसून चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. 'एबीपी माझा' सोबत बोलताना आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मी जे बोललो ते चुकीचे आहे सिद्ध करा...
जितेंद्र आव्हाड यांचा वध करू असं म्हणणाऱ्या तसेच त्यांना धमकी देणाऱ्या महंत आणि राजकीय नेत्यांना आव्हाड यांनी समोरासमोर येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. महाराष्ट्राच्या शिवरायांच्या भूमीतून मला जन्म झाला असून मी मरणाला घाबरत नाही. पण मी जे बोलतोय ते चुकीचे आहे हे सिद्ध करा असे आव्हान देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. तुम्हीच सांगाल तोच राम, असं असू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले.
वाल्मिकी रामायणातील संदर्भ गुरुवारी दिल्यानंतर आज जितेंद्र आव्हाड यांनी ग. दि. माडगूळकर यांच्या गीत रामायणातील संदर्भ देऊन श्रीराम हे मांसाहारी असल्याचे दाखले दिले आहेत. ग.दि. माडगूळकर यांनी गीत रामायणाच्या आपल्या रचनेतही म्हटले होते. गदिमा यांनी गीत रामायण करताना त्यांनी अभ्यास केला असलेच ना, असा प्रश्नही आव्हाड यांनी केला.
धमकी देणारे राम भक्त असूच शकत नाही
आपल्याला जीवे मारण्याची धमकी देणारे महंत वगैरे राम भक्त असूच शकत नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले. राम म्हणजे प्रेमळ, सोज्वळ आहेत, मर्यादापुरुषोत्तम आहेत. शबरीला आपलं मानणारे राम होते...सर्वसामान्यांना आपलं मानणारं राम होते. धमकी देणाऱ्या महंतांना धर्मांचं, कर्माचं ज्ञान नसते असेही आव्हाड यांनी म्हटले.
खेद व्यक्त करतो असे म्हटले.
जे वाल्मिकी म्हणतात, ग दि माडगूळकर म्हणतात.. लक्ष्मण जोशी आपल्या लेखात म्हणतात, त्याला तुम्ही कसे नाकारणार. समोरच्या बाजूचा मुद्दा त्यांना समजून घ्यायचा नाही का, असा प्रश्नही त्यांनी केला. आपल्याला विरोध करणाऱ्यांनी वाल्मिकी रामायण वाचले आहे का, वाल्मिकींना विरोध करणार का, असा उलट प्रश्न आव्हाड यांनी केला.