Girish Mahajan On Eknath Khadse : जळगावमध्ये भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. खडसेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता गिरीश महाजन यांनी थेट खडसे यांनाच आव्हान दिले आहे. खडसे यांनी मतदार संघात एकदा निवडून दाखवावे, उगाच तोंडाच्या वाफा सोडू नका अशा शब्दांत महाजनांनी डिवचले.
महायुतीचे सरकार हे अपयशी असल्याचे वक्तव्य एकनाथ खडके यांनी शिर्डी येथील पक्षाच्या अधिवेशनादरम्यान केले होते. एकनाथ खडसेंच्या या वक्तव्याचा गिरीश महाजन यांनी चांगला समाचार घेतला आहे. एकनाथ खडसेंनी लोकसभेला उभे राहावं आणि निवडून येऊन दाखवावं असं थेट चॅलेंज गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिले आहे. निवडणुकीत उभा राहिल्यावर कळेल की यश अपयश कोणाचं आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंनी उगाच तोंडाच्या वाफा सोडू नये असा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर केला आहे.
लोकसभेच्या उमेदवारी बाबत आपल्या नावाच्या चर्चेत गिरीश महाजनांनी खंडन केलं आहे. मी आमदार आहे आमदारच राहणार असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. माझा लोकसभेचा कोणताही विचार नसून माध्यमांनीच हा विषय काढला असल्याचे त्यांनी म्हटले. तर आपल्याला सत्तेची हाव नसून पक्षाने आमदारकी नाही दिली तरी आपण पक्षाचे काम करत राहू. त्यामुळे इकडे पडलो की तिकडे जायचं चोऱ्या माऱ्या करायच्या असे उद्योग मी करत नसल्याचे म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे.
देशभरात स्वच्छता मोहीम सुरू आहे, राजकीय आकासाचा गैरसमज नको
गिरीश महाजन यांना रोहित पवार यांच्या कार्यालयावरील छाप्यांबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की, देशभरात स्वच्छता मोहीम सुरू त्यामुळे राजकीय आकासातून केलं जातंय असा गैरसमज करू नये. ज्यांच्यावर संशय आहे त्या सर्वांवर छापेमारी सुरू आहे. तुम्ही काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. संघर्ष यात्रा काढल्या म्हणून तुम्हाला सर्व माफ असतं का? केंद्रीय यंत्रणेला संशयास्पद आढळला असेल म्हणून त्यांचा तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. रोहित पवार प्रामाणिक असतील तर त्यांना घाबरण्याचं कारण नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.