Jitendra Awhad मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवास्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आव्हाड यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या घरातील गणरायाचे दर्शन यावेळी घेतले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांनी या भेटीबद्दल प्रश्न विचारला असता, जितेंद्र आव्हाड यांनी मिश्किल उत्तर दिले आहे. मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत त्यांनी याविषयी अधिक बोलणे टाळले आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या घरी येऊन गणपतीच दर्शन घेतलं, नंतर यायला मला मिळत नाही आणि नंतर ते ही भेटत नाहीत, म्हणून आत्ता मी आल्याचेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आमचे वैचारिक मतभेद आहेत आणि ते कायम राहतील
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपूर्वी चांगल्याच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. 'शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही', अशी टॅगलाईन देत सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक होण्याची आदेश दिले होते. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुप्रिया ताईंच वक्तव्य तस नव्हतं, ताई कधीही अशी भाषा वापरत नाहीत. पत्रकारांना ही माहिती आहे. मात्र कोणी ही माहिती दिली हे मला माहीत नाही. आमचे वैचारिक मतभेद आहेत आणि ते कायम राहतील, पण हे अत्यंत चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे मित्र वाढलेत, त्यामुळे या मित्राला वेळ द्यायला त्यांना वेळ नाही
जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एक एकाच जिल्ह्यात राहात असून त्यांच्यात चांगली मैत्री असल्याचे सर्वश्रुत आहे. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या शी माझी मैत्री तर आहेच. हे मी कधीही नाकारलंच नाही, फक्त मुख्यमंत्री झाल्यामुळे भेटीगाठी कमी झाल्या आहेत, त्यांचे मित्र अधिक वाढलेत, त्यामुळे या मित्राला वेळ द्यायला त्यांना कमी वेळ मिळतो, असा मिश्किल टोला ही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. शरद पावरांच्या मनात काय आहे हे त्यांचा बायकोला नाही समजत, तर हे देवेंद्र फडणवीस साहेबांना कुठनं समजणार, अहो ते शरद पवार साहेब आहेत, सत्तर वर्ष त्यांच्या मनात काय आहे हे उभ्या महाराष्ट्राला समजलं नाही आणि देवेंद्रजींना समजणार? असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
हे ही वाचा