औरंगाबाद : मुंबईहून औरंगाबादला आलेल्या जेट एअरवेजचे विमान चिकलठाणा विमानतळावर लँडिंग करत असतानाच बगळ्याची धडक बसली. वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचं सुखरुप लँडिंग केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. विमानातील 169 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.


जेट एअरवेजचे 9W355 हे विमान चिकलठाणा विमानतळावर लँड‍िंग करत असताना विमानाच्या डाव्या पंख्याला बगळ्याची धडक बसली. अपघातानंतरही वैमानिकाने विमान सुखरुप धावपट्टीवर उतरवले. सकाळी सव्वापाच वाजता या विमानाने मुंबईकडून औरंगाबादला प्रस्थान केलं, त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.

बगळ्याच्या धडकेनंतर विमानात बिघाड झाल्यामुळे पुन्हा मुंबईला जाणाऱ्या 136 प्रवाशांचा खोळंबा झाला. मुंबईला जाणारे अनेक उद्योजक, आमदार अतुल सावे, वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, माजी महापौर भगवान घडामोडे यांच्यासह अनेकांना आपला आजचा विमान प्रवास रद्द करावा लागला.

मुंबईहून संध्याकाळी पाच वाजताच्या विमानाने इंजिनमधील नादुरुस्त भागाचा बदली पार्ट येईल, त्यानंतर विमानाच्या उड्डाणाबाबत निर्णय घेतला जाईल.