Pune Donky Market : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत (Jejuri) पौष पोर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरला आहे. यात चार कोटींपेक्षा जास्त किंमतची उलाढाल झाली आहे. जेजुरीच्या गाढवांच्या पारंपारिक बाजारात काटेवाडी, गावठी आणि विविध प्रकारचे हजारो गाढवे दाखल झालेली आहेत. पौष पौर्णिमेला जेजुरीच्या खंडेरायाची यात्रा असते आणि याच दिवशी गाढवांचा बाजाराचा मुख्य दिवस असतो. जेजुरीत संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशमधून गाढवे विक्रीस येत असतात. दहा हजार रुपयांपासून ते एक लाख वीस हजारापर्यंत भाव या गाढवांना मिळाला आहे. 


बाजारात दोन हजारापेक्षा जास्त गाढवे आली होती तर चार कोटी पेक्षा जास्त उलाढाल या बाजारात झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. जेजुरी येथे भरणारा गाढव  बाजार मोठा बाजार समाजाला जातो. बाजारामध्ये गाढवाचे दात, रंग पाहून त्याची किंमत ठरविली जाते. दोन दातांच्या गाढवांना दुवान, चार दातांच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड जवान असे म्हटले जाते. आवश्यकता वाटल्यास त्याला पळवत नेऊन शारीरिक चाचणी घेतली जाते. बाजारात गाढवे विक्रीसाठी आणणारे व्यापारी पौर्णिमेअगोदर गाढवांना भरपूर खायला घालतात.


1 लाख रुपयांपासून तर 80 लाख रुपये किंमतीची गाढवं


आम्ही म्हाडा तालुक्यातील टेंभूर्णी गावातून दरवर्षी येत असतो. प्रत्येक वर्षी  2 ते 3 गाढव विकत घेतो. त्यामुळे दरवर्षी आवर्जुन येतो. यावेळीदेखील 3 गाढवं विकत घेतले आहेत. यावेळी 1 लाख रुपयांपासून तर 80 लाख रुपये किंमतीची गाढवं विकायला आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गाढवांचा बाजार भरला आहे. त्यामुळे अनेकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं आहे. 


2 हजार गाढवं...


यंदाच्या मेळाव्यात दोन हजाराहून अधिक गाढवं आले आहेत. यावेळी या मेळाव्यात कोट्यावधींची उलाढाल झाली आहे. या मेळाव्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो लोकांनी गर्दी केली आहे. या गाढवाचा उपयोग विट भट्टीवर कामासाठी होत असतो. त्यामुळे अनेक लोक या मेळाव्यात हजेरी लावत असतात. 
 
दातावरुन गाढवाची किंमत


गाढवाची किंमत त्यांच्या दातावरुन कळत असते. डोंगरावरच्या कामासाठी गाढवाचा उपयोग केला जातो. गाढवाच्या दुधालाही चांगली किंमत आहे. पुण्यात शंभर रुपयात एक चमचा एवढी किंमत आहे. ओझं वाहण्याचा व्यवसाय करणारे गाढवं विकत घेतात. या मेळाव्यात विविध प्रकारचे गाढवं यंदा विक्रीला आले आहेत. अनेक चांगल्या जातींच्या गाढवाला चांगली किंमतदेखील मिळत आहे, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.