जेजुरी : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द करण्यात आली आहे. सोमवती यात्रेच्या दिवशी जेजुरी गडावरुन उत्सवमुर्ती पालखीतून कर्हा स्नानासाठी गडाच्या पायथ्याशी नेण्यात येतात. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे. तसेच सोमवती यात्रेनिमित्त सोन्याच्या जेजुरीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एरवी भंडाऱ्याच्या उधळणीने पिवळी झालेली सोन्याची जेजुरी यंदा मात्र शांत असणार आहे.



 12 ते 14 तारखेदरम्यान जेजुरीत येऊ नका, असं आवाहनही प्रशासनानं केलं आहे. 12 ते 14 डिसेंबरपर्यंत, म्हणजेच, शनिवार ते सोमवार तीन दिवसांसाठी भाविकांना जेजुरीत प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे या तीन दिवसात खंडोबा गडाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येणार असून मंगळवार नंतर पुन्हा खंडोबा गडावर भाविक जाऊ शकतील, अशी माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली आहे.


पाहा व्हिडीओ : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द


अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा कोरोनामुळे रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे. सोमवती यात्रेच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत मोठ्या प्रमाणावर भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार, जेजुरीत कलम 144 नुसार, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी 12 ते 14 डिसेंबर दरम्यान, जेजुरीत येऊ नये, सोमवती यात्रेचा सोहळा रद्द करण्यात आला आहे, असं आवाहन मार्तंड देवस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे यांनीही केलं आहे.


खंडोबा गडावर मंगळवारी चंपाषष्टी उत्सव सुरु होणार आहे. या पाच दिवसांच्या काळात ग्रामस्थ आणि भाविकांना नेहमीप्रमाणे मुखदर्शनची सोय करण्यात आली असून प्रथेप्रमाणे पूजाविधी पार पडणार आहेत. तसेच दर्शन मंडपामध्ये पुजारी सेवक अन्नदान मंडळातर्फे पाच दिवस दररोज अन्नदान केले जाणार आहे.