JEE Main 2023 : जानेवारीत होणाऱ्या जेईई मेन (JEE Main) परीक्षे संदर्भात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. परीक्षेच्या पात्रतेसाठी घातलेली बारावीतील 75 टक्के गुणांची अट शिथिल करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आलीय. तसेच जानेवारीत होऊ घातलेली परिक्षा एप्रिलमध्ये घेण्याचे निर्देश देण्याची विनंती या याचिकेतून करण्यात आलीय. 


जानेवारी महिन्याच्या शेवटी अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी जेईई मेन ही परीक्षा होणार आहे. परंतु, ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी आणि त्यासाठी असलेला किमान 75 टक्के गुणांच्या पात्रतेचा निकषही शिथिल करावा अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. योग्य खंडपीठापुढे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही याचिका सुनावणीसाठी वर्ग करण्याचे निर्देश न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती एस.जी. चपळगावकर यांच्या सुट्टीकालीन खंडपीठनं दिले आहेत.


पुढील महिन्यात 24 ते 31 जानेवारीदरम्यान होणारी जेईई मेन ही परीक्षा पुढे ढकलण्यासह आयआयटीमध्ये प्रवेशास पत्र होण्यासाठी 75 टक्के गुणांचा पात्रता निकष शिथिल करावा, अशी मागणी अँड. अनुभा श्रीवास्तव सहाय यांनी जनहित याचिकेतून केली आहे. तसेच जेईई मेन परीक्षा घेण्याबाबत आणि परीक्षेच्या पात्रता निकषाबाबत केंद्रीय परीक्षा संस्थेनं (एनटीए) 15 डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेलाही याचिकेतून आव्हान दिलेलं आहे. आयआयटीमधील प्रवेशासाठी उच्च माध्यमिक परीक्षेतील किमान 75 टक्के गुणांचा पात्रता निकष उत्तीर्ण गुणांपर्यंत शिथिल करण्यात यावा. मागील वर्षी 75 टक्के गुणांचा पात्रता निकष लागू नव्हता, असंही सहाय यांनी या याचिकेत म्हटलेलं आहे. अचानक करण्यात पात्रता निकषांतील या बदलामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसू शकतो, असा दावाही याचिकेतून केलेला आहे.


जेईई परीक्षेच्या कालावधीत 12 वी बोर्डाच्या तसेच विविध राज्य व अन्य परीक्षा मंडळांच्या पूर्वपरीक्षा होणार आहेत. बहुतांश राज्य मंडळांनी जानेवारीमध्ये त्यांच्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षांचं वेळापत्रक आखलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आयआयटी जेईई मेन ही परीक्षा देणं शक्य होणार नाही. जेईई परीक्षेची घोषणा शेवटच्या क्षणी करण्यात आली असून साधारणपणे वेळापत्रकाच्या तीन-चार महिने आधी परीक्षा जाहीर होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळतो. परंतु जानेवारीमधील नियोजित मुख्य परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना जेईईच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, असा दावाही याचिकेतून केलेला आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI