Abdul Sattar: अब्दुल सत्तार यांच्या राजीनामासाठी सकाळपर्यंत आक्रमक असलेले विरोधक आज संध्याकाळपर्यंत अचानक शांत झाले. खरंतर विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहांमध्ये या प्रश्नावर विरोधकांनी आज आवाज उठवला नाही.


सकाळी वारकऱ्यांच्या वेशात घोषणा देताना अंबीयन्स.... अब्दुल भाई वसुली भाई अशा घोषणा विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर दिल्या. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी सकाळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. वारकऱ्यांच्या वेशात पायऱ्यावर भजनही केलं. त्यामुळे आज अब्दुल सत्तारांच्या मुद्द्यावरून विरोधक सभागृहाचे कामकाज चालू देणार नाहीत असं सगळ्यांनाच वाटलं. पण सभागृहात मात्र या उलट चित्र दिसलं.. काल अब्दुल सत्तार यांच्या मुद्द्यावरून कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं होतं. आज मात्र विरोधक या मुद्द्यावरून सभागृहात गप्प बसले. अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्याबद्दल ना विधान परिषदेत आवाज उठला. ना विधानसभेत. त्यामुळे अब्दुल सत्तारांच्या प्रश्नावर विरोधक गप्प का झाले? असा प्रश्न उपस्थित झालाय. 


 अब्दुल सत्तार यांच्यावर काय आरोप?


अब्दुल सत्तारांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून वाशीम जिल्ह्यातील 150 कोटींची 37 एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिली. 


सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात होत असलेल्या 'सिल्लोड कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.


संजय राठोडांवर आरोप काय?


संजय राठोड यांनी 2019 मध्ये 5 एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले.


 गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे नियमानुकूल करण्याची तरतूद नाही. 


कोर्टानेदेखील याबाबतचे आदेश वेळोवेळी दिले आहेत. संबंधित 5 एकर जागा नियमानुकूल करण्याचे आदेश तत्कालीन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले होते.


जिल्हाधिकाऱ्यांनी 2018 मध्ये दिलेला आदेश संजय राठोड यांनी रद्द केला.


शिंदे गटातील या दोन्ही मंत्र्यांवर विरोधकांनी काल गंभीर आरोप केले होते. त्यासाठी दिवसभर कामकाजही तहकूब झालं. पण या दोन्ही आरोपावर ना अब्दुल सत्तार यांनी अद्याप उत्तर दिलं ना संजय राठोड यांनी. तरीही विरोधक शांत आहेत. खरंतर एखादा मुद्दा सभागृहात लावून धरल्यानंतर तो तडीस नेणे आवश्यक आहे. अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाले. त्यात पुढे नेमकं काय झालं हे आरोप खरे होते की खोटे? याचे उत्तर जनतेला मिळायला हवं. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचीही ती जबाबदारी आहे. पण अचानकपणे विरोधक शांत झाल्यामुळे सत्तार आणि संजय राठोड यांचे पुढे काय होणार हा प्रश्न जनतेला पडलाय.