जळगाव : जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. शिवसेनेने महापौरपदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे नाव निश्चित केले आहे. आज सकाळी 11 वाजता शिवसेनेच्या महापौर पदाचे उमेदवार जयश्रीताई महाजन व उपमहापौर पदाचे उमेदवार भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील यांनी आज मोठ्या थाटामाटात आपले नामांकन अर्ज दाखल केले. यावेळी शिवसेनेचे  माजी महापौर नितीन लड्डा व तमाम शिवसैनिक उपस्थित होते. ही नामांकन प्रक्रिया सुरू झालेली असून आता उद्याच्या ऑनलाईन मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. जवळपास या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याची जोरदार चर्चा सर्वत्र आहे. 


मात्र भाजपने अद्यापही महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नसून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी भाजप आपला उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौर व उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये पडलेल्या फुटीमुळे निवडणूक चुरशीची झाली आहे. शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजावत जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर सर्व भाजपने देखील नगरसेवकांना व्हीप बजावून पक्षाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पक्षाच्या उमेदवारांव्यतिरिक्त इतर पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास संबंधित नगरसेवकांवर कारवाईचा इशारा देखील भाजपने दिला आहे. भाजपकडून प्रतिभा कापसे व दीपमाला काळे यांचे नाव महापौर पदासाठी सर्वात आघाडीवर आहे. तर उपमहापौरपदासाठी अद्यापही कोणत्याही नावावर चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली .


महापौरपदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी म्हटलं की गेल्या काही महिन्यांपासूनच भाजपच्या अंतर्गत नाराजीमुळे तिथला एक गट शिवसेनेत येणार असल्याचे अगोदर पासूनच संकेत मिळत होते. त्यामुळे आज भाजपमधील जो गट इकडे आला आहे, याचा अंदाज आम्हाला होताच. उद्या आम्हाला पूर्ण स्पष्ट बहुमत मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास नव्हे तर खात्री असल्याचं जयश्री महाजन यांनी सांगितलं. जयश्री महाजन यांनी जळगाव मनपावर सेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 


भाजपमधून आजच शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या कुलभूषण यांनी उपमहापौर पदाचा उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, भाजपमध्ये असताना कोणत्याही प्रकारची कामे होत नसल्याने जनतेतून आम्हाला नाराजीला सामोरं जावं लागतं होत. कोणत्याही प्रकारची आमची दखल घेतली जात नव्हती आणि यातूनच नगरसेवक नाराज होते. त्याचा परिणाम म्हणून मोठा गट आज भाजपमधून सेनेत आला असल्याने भाजपचा पूर्णपणे सुपडा साफ होईल, अशी प्रतिक्रिया कुलभूषण पाटील यांनी दिली आहे.