सोलापूर : सोलापुरातील एमआयएमचे नगरसेवक तथा माजी शहराध्यक्ष तौफिक शेख राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी तौफिक शेख यांनी एमआएमच्या सात नगरसेवकांसह मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हापासून शेख एमआयएमला रामराम करुन राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता तर थेट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनीच शेख यांना सूचक इशारा दिला आहे.


पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापुरातील हेरिटेज हॉल येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी आवर्जुन तौफिक शेख यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते. यावेळी एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांनी आपल्यासह सात नगरसेवकांचा पाठिंबा महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना असल्याचं जाहीर केलं.


यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी तौफिक शेख यांचे आभार व्यक्त केले. तसेच "कुछ दिनों बाद तौफिक भाई आपको मुंबई आना होगा, या मैं फिर सोलापूर आऊंगा. आप जैसे तय करेंगे वैसे होगा" असे म्हणत शेख यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाला जणू होकारच दिला. मात्र थेट प्रवेशाबद्दल बोलण्यास दोन्ही पक्षातील नेत्यांनी नकार दिला. "सध्या प्रवेशाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. केवळ पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांना पाठिंबा देण्याबाबत ही बैठक झाली. 1 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर प्रवेशाच्या विषयावर चर्चा होईल" अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी दिली. तर "शरद पवार यांचे काम, ध्येयधोरणे आम्हाला आवडल्याने आम्ही पाठिंबा देत आहोत. प्रवेशाबाबत अद्याप आपल्याला नंतर कळेल" अशी प्रतिक्रिया नगरसेवक तौफिक शेख यांनी दिली.



कोण आहेत तौफीक शेख?
तौफिक शेख हे आधी काँग्रेस पक्षात होते, मात्र काही विषयावरुन 2014 साली त्यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्याविरोधात तौफिक यांनी निवडणूक देखील लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत तौफिक यांचा पराभव जरी झाला तरी लढत मात्र फार रंजक झाली. 2017 साली सोलापूर महापालिकेत एमआयएमने पहिल्यांदा निवडणूक लढवली. ज्यात नऊ नगरसेवक निवडून देखील आले.


सोलापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीत मिळालेल्या यशात तौफिक यांचा प्रमुख वाटा होता. मात्र मे 2019 मध्ये विजयपूर येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांच्यावर ठेवण्यात आला. या प्रकरणी त्यांना अटक देखील झाली. तौफिक यांच्यानंतर सोलापूर शहर आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून फारुख शाब्दी यांची निवड करण्यात आली. यामुळे तौफिक यांना पक्षातर्फे डावलण्यात आलं. काही दिवसांपूर्वी तौफिक यांना जामीन मंजूर झाल्याने ते तुरुंगातून सुटले आहेत. मात्र आपल्यावर खोटे गुन्हे दाखल असताना पक्षाने आपल्याला साथ न दिल्याने आपण नाराज आहोत. त्यामुळे समर्थकांच्या मनात पक्षांतराचा विचार सुरु असल्याची भावना तौफिक शेख यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली होती.