नाशिक: खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊ चौधरी (Bhau Chaudhari) यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यानंतर नाशिकची शिवसेना खिळखिळी झाल्याचं चित्र आहे. आधी 12 माजी नगरसेवकानी शिंदे गटात प्रवेश केला आणि आता नाशिकच्या संपर्क प्रमुखाची जबाबदारी असणारे संजय राऊत यांच्याबरोबर सावलीसारखे  सोबत राहणारे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय भाऊ चौधरी यांनीच शिंदें गटात प्रवेश केल्यानं नाशिकच्या शिवसेनेच्या गडाला सुरूंग लागला आहे. हिवाळी अधिवेशनानंतर आणखी काही माजी नगरसेवक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आल्याची चर्चा आहे.


खासदार संजय राऊत यांच्यांकडे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेतेपद आहे. तुरुंगातून मुक्तता झाल्यानंतर राऊत 15 दिवसात दोन वेळा नाशिकला येऊन गेलेत. मात्र नाशिकचा गड त्यांना सांभाळत आला नाही. आमदार सुहास कांदे, खासदार हेंमत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे यांच्या पाठोपाठ भाऊ चौधरीनाही ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यानं शिंदे गटाची ताकद वाढली असून भाऊ चौधरी आणि माजी महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांच्यांवर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र भाऊ चौधरी आधीच शिंदे गटाला मिळाले होते, त्यानीच 12 माजी नगरसेवक आधी शिंदें गटात पाठवले आणि नंतर स्वत: प्रवेश केल्याचा आरोप ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला.


उत्तर महाराष्ट्रमध्येच संजय राऊत यांना दणका


नाशिकमधून पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, आणि  खासदार हेंमत गोडसे यांनी ढाल तलवार हाती घेतली आहे तर जळगाव जिल्ह्यातील आ. किशोर पाटील, आ. चिमण आबा पाटील,आ. चंद्रकांत पाटील ,आ. लता सोनावणे, मंत्री गुलाबराव पाटील हे पाच आमदार  शिवसेनेतून शिंदे गटात गेले आहेत. जळगाव मनपा आणि धरणगाव मधून 20 नगरसेवक हेसुध्दा शिंदे गटात गेले आहेत


अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्या पाठोपाठ शिर्डीतील तीन आजी- माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांनी प्रवेश केला. तर सहा तालुक्यातील अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. खासदार हे पद वगळता कोणत्याही मोठ्या नेत्याने अद्याप प्रवेश केला नाहीये. मात्र अनेक माजी पदाधिकारी व माजी नगरसेवक मात्र शिंदे गटात गेल्यावर त्यांना पदेही मिळाली आहेत.


धुळ्यातील साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित या एकमेव शिंदे गटात गेल्या आहेत. शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख सतीश महाले आणि मनोज मोरे हे दोघे पदाधिकारी ठाकरे गटातून शिंदे गटात गेले आहेत.


नंदुरबार जिल्ह्यातून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात नंदुरबार आणि धडगाव नगरपंचायतीचे 39 नगरसेवक, सहा जिल्हा परिषद सदस्य, 20 पंचायत समिती सदस्य शिंदे गटात गेले आहे.