मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी करणाऱ्या पक्षांतर्गत विरोधकांना जयंत पाटील यांनी आव्हान दिलं आहे. पुढच्या दोन दिवसात प्रत्येकाने आपल्या वॉर्डात पक्षाला किती मतं दिली त्याचा डेटा द्या, आठ दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो असं जयंत पाटील म्हणाले. पक्ष चालवणं हे काही सोपं काम नाही, सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावं लागलं असंही ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
आठ दिवसात राजीनामा देतो
पदाधिकाऱ्यांच्या मागणीनंतर जयंत पाटील म्हणाले की, "पक्ष चालवणं हे काही सोपं काम नाही. जोरदार भाषण करून उपयोग नसतो. डोकं शांत ठेऊन आक्रमक कार्यकर्त्यांसह शांत कार्यकर्त्यांना एक करायचं असतं. प्रत्येकाने पुढील 2 दिवसांत आपण आपल्या वॉर्डात पक्षाला किती मत मिळवून दिली ते सांगा. त्यानंतर आठ दिवसात राजीनामा देतो."
बोलणं सोपं, चांगला माणूस मिळणं अवघड
पक्षाला नवीन पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष द्या अशी मागणी काही नेत्यांनी केली. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, "मी एकटा कितीवेळ काम करायचं?आठ दिवसांचा वेळ द्या स्वत:हून प्रदेशाध्यक्षपद सोडतो. निवडणुकीत बुथवर काम केल्याचा डेटा द्या. कुणी काय काम केलं याची सविस्तर माहिती द्या. त्यानंतर प्रदेशाध्यपदावरुन बाजूला होतो. बोलणं सोपं असतं, चांगला माणूस मिळणं अवघड असतं."
प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी
विधानसभेतल्या पराभवानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला पदाधिकाऱ्यांच्या संताप उफाळून आल्याचं दिसून आलं. त्यांच्या टार्गेटवर आहेत प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. कार्यकर्त्यांनी थेट शरद पवार यांच्यासमोरच आपल्या भावना व्यक्त केल्या. जयंत पाटील हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
मराठा व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष द्या, पदाधिकाऱ्यांची मागणी
मराठाव्यतिरिक्त आणि कार्यकर्त्यांना वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष असावा अशी काही पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. केवळ प्रदेशाध्यक्षच नव्हे तर सर्वच प्रमुख पदांवर बदल व्हावेत अशी मागणी करण्यात आली. तसंच रोहित पवार आणि रोहित पाटलांना मोठी जबाबदारी देण्याची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे.
ही बातमी वाचा: