मुंबई : वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीसाठी आजपासून (शनिवार) राज्याचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन मुंबईत होत आहे. जीसएटी विधेयक केंद्रात मंजूर झालं असून आता राज्यात जीएसटी मंजूर करुन घेण्याचा सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.


जीएसटीवर चर्चेदरम्यान पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शिवसेना आणि भाजपवरही निशाणा साधला.

जयंत पाटील काय म्हणाले?

मुंबई महापालिकेला पैसे देताना काही ऑडिट घेणार का, कुठे किती पैसे जाणार, खर्च करताना पारदर्शी कारभाराबाबत काय, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी काय व्यवस्था आहे, हे जीएसटीत दिसत नाही, असं जयंत पाटील म्हणाले. शिवाय मुंबई महापालिकेला पैसे देण्यासाठी विरोध नसल्याचंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

‘मातोश्री’वर अष्टप्रधान मंडळासमोर सुधीर भाऊंनी प्रझेन्टेशन दिलं. मुख्यमंत्री ज्या वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजायला निघाले होते, त्याच वाघाच्या जबड्यात सगळं ओतायला निघाले. हे बिल ‘मातोश्री’वरून आलंय त्यामुळे याला ‘मातोश्री’ बिल म्हणायला हरकत नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

शिवसेनेला राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत दुखवायचं नाही म्हणून सुधीर भाऊ 'मातोश्री'वर गेले असावे, असंही जयंत पाटील म्हणाले.

सुधीर भाऊ मातोश्रीवर गेले याचं दुःख नाही, पण जे दस्ताऐवज घेऊन गेले त्याला आक्षेप आहे. सभागृहात मांडण्याआधी जीएसटीचा मसुदा ‘मातोश्री’वर नेण्यात आला, हे परंपरेला धरून नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेवर जायला निघाला होतात. आता वॉचमनची ड्युटी करत आहेत. आशिष शेलार तुम्ही पक्षासाठी एवढी मेहनत घेतली, 82 जागा आणल्या पण तुम्ही तिकडेच.. 'प्रसाद' मात्र दुसऱ्यालाच, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.