शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामाला निधी मिळाल्यानं गती आहे. आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यासह राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संगमनेरमध्ये निळवंडे धरणाच्या कालव्यांची पाहणी केली. मात्र यावेळी शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांना डावलल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. 


राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना आज निळवंडे धरणाच्या कामांची पाहणी करताना शिवसेनेच्या खासदाराला डावलल्यामुळे सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी नाराजी व्यक्त केली. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वांवर कारवाई करण्याची मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी पोलिसांकडे केली आहे.


महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यासह राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात बांधलेल्या पुलाची केली पाहणी केली व कामाबाबत समाधान व्यक्त केलं. राज्यासमोर अनेक अडचणी असल्या तरी निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करणे आमची प्राथमिकता असून  कालव्यांची कामे पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील अनेक तालुक्याचा पाणी प्रश्न मिटेल, अस जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.  निळवंडे प्रकल्पासाठी 500 कोटींचा निधी दिला असून जून 2022 पर्यंत काम पूर्ण करणार  आहे. काम पूर्ण करण्यासाठी वाढीव मदत लागली तर ती देणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. 


राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामाबाबत पाठपुरावा केला असून ज्याज्या वेळी आम्हाला आघाडी सरकारला संधी मिळाली त्यात्या वेळी या कामांना गती मिळाली, असं वक्तव्य थोरात यांनी केलं. आमच्या पाठपुराव्याने निधी जास्त मिळाला आणि त्यामुळे 2022 मध्ये या कालव्यांमधून पाणी पुरवठा सुरू होईल अशी आशा वाटते, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.