मुंबई : जनता भाजप नेत्यांवर रचनात्मक टीका करत आहे, तर ती भाजपा नेत्यांना सहन होत नाहीये. भाजपाने रडीचा डाव खेळू नये, अशा शब्दात मंत्री आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना उत्तर दिलंय. भाजप नेत्यांवर ट्रोलिंग होते म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी काल पोलिसांत तक्रार केली आहे. यावरुन जयंत पाटलांनी सोशल मीडियातील टीका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का? असा सवाल केला आहे.


भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्‍या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. ही मागणी करण्यापुर्वी त्यांनी 'आघाडी बिघाडी', 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, आज संपूर्ण जग कोरोना सोबत लढत असताना, भाजपा नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्यावरील टीका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजपा नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हेच यातून स्पष्ट होते. सोशल मीडियातील टीका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का?, असा सवाल त्यांनी केला आहे.

गेली पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना, अत्यंत अश्लील टीका एका विशिष्ट गटाकडून आमच्यावर होत होती. त्यावेळी आमच्या तक्रारी सुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते आज जनता भाजपा नेत्यांवर रचनात्मक टिका करत आहे, तर ती भाजपा नेत्यांना सहन होत नाहिये. भाजपाने रडीचा डाव खेळू नये, असंही पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

यात शेवटी पाटील यांनी जागतिक हास्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज जागतिक हास्य दिन आहे. माझ्याकडून जागतिक हास्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. हसत रहा, हसवत रहा, असं त्यांनी म्हटलंय.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लील शब्दांत टीका व ट्रोलिंगविरोधात भाजप नेत्यांनी काल मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांचं एक शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना भेटलं. यावेळी बोलत असताना आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील असंही दरेकर म्हणाले होते.