सोलापूर: शेतकरी संपावरुन संभ्रम निर्माण झाल्यानंतर आता मतभेद उघड होत आहेत. कारण सरकारशी वाटाघाटीत आघाडीवर असलेल्या शेतकरी कोअर कमिटीतील सदस्य जयाजी सूर्यवंशी यांचा पुतळा जाळण्यात आला.


शेतकऱ्यांचा संप मिटला नाही. हा संप अधिक तीव्र होणार असल्याचे किसान क्रांती मोर्चाच्या कोअर समितीचे सदस्य तथा बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील-घाटणेकर यांनी सांगितलं.

एकीकडे किसान क्रांती मोर्चाचा सदस्य म्हणून आपणांस मुंबईत रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी येण्याबाबत रात्री उशिरा  निरोप आला. त्यानुसार मुंबईला जाण्यासाठी निघालो असताना, वाटेत पुणे ग्रामीण पोलिसांनी आपणास अचानकपणे अडविले आणि ताब्यात घेऊन देहू रोड पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. नंतर पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी तथाकथित शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा पूर्ण होऊन एकतर्फी स्वरूपात शेतकऱ्यांचा संप मिटल्याचे जाहीर केले गेले. तेव्हाच आपल्याला पोलीस ठाण्यातून सोडण्यात आले, असा आरोप घाटणेकर यांनी केला.

शासनाच्या दडपशाहीचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. शासनाने संपकरी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा कुटील डाव आखला आहे. त्यास शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन घाटणेकर यांनी केले आहे.

संबंधित बातम्या 

नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम 

मुख्यमंत्र्यांनी जयाजी सूर्यवंशींच्या कानात काय सांगितलं?