James Laine Controversial Book : छत्रपती शिवरायांबाबत जेम्स लेन यांनी लिहिलेल्या पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी माहिती पुरवल्याच्या आरोपावरून राज्यात राजकारण पुन्हा ढवळून निघत असताना आता या वादात स्वतः लेखक जेम्स लेननं स्पष्टीकरण दिलं आहे. 'शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या जेम्स लेन लिखित पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे हे माहितीचा स्त्रोत नव्हते अशी माहिती स्वतः जेम्स लेनने दिली आहे. इंडिया टुडेनं ई-मेलद्वारे त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत या पुस्तकाबाबत त्यांनी भाष्य केलं असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या पुस्तकात आपण कुठलाही ऐतिहासिक दावा केला नसून 'त्या' पुस्तकासाठी कुणीही माहिती पुरवली नाही, असा दावाच जेम्स लेननं केलाय. तसंच पुस्तक लिहीत असताना बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही जेम्स लेननं या मुलाखतीत सांगितलं आहे.
शरद पवार यांनी नुकतंच पुरंदरे यांनी जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली असा आरोप केला होता त्यावर राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास कोणत्या पानावर सांगितला ते तर सांगा असं म्हणत तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी सुरु आहेत असा आरोप केला होता.
यावर आता खुद्द जेम्स लेन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. जो कोणी माझं Shivaji: Hindu King in Islamic India पुस्तक नीट वाचेल त्याला मी कोणताही ऐतिहासिक दावा करत नसल्याचं लक्षात येईल. मी शिवाजी महाराजांचा अपमान केला अशी टीका करणाऱ्यांनी नीट वाचलेलं नाही. पुन्हा सांगतो की मी फक्त कथा सांगतो, ऐतिहासिक तथ्य नाही, असं जेम्स लेननं मुलाखतीत म्हटलं आहे.
जेम्स लेन आणि पुस्तक वाद : महाराष्ट्रात आतापर्यंत काय काय घडलं?
जेम्स लेननं आपली कधीच एका शब्दानेही बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं आहे. पुरंदरे हे एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात प्रख्यात समर्थक होते आणि त्याबद्दल ते बराच काळ लोकप्रिय होते. छत्रपती शिवाजी महाराज हे महान वीर होते. पण मला खेद वाटतो की त्यांचे चरित्र हा विद्वत्तेचा विषय नसून समकालीन राजकीय विवादांचं साधन झालं आहे, असंही जेम्स लेननं म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेबरोबर मस्ती करु नका- जितेंद्र आव्हाड
जेम्स लेन यांना कोण मॅनेज करत हे याची कल्पना नाही. आधी त्या पुस्तकातील वादग्रस्त मजकूर वगळा आणि मग बोला, असं राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. आताच का जेम्स लेनला बाहेर काढलं गेलं. इतका गोंधळ झाला त्यावेळी लेनला कुठं गाडलं होतं. इतक्या वर्षानंतर तो मिळतो. महाराष्ट्राच्या अस्मितेबरोबर मस्ती करु नका, अन्यथा परिणाम गंभीर होतील, असंही आव्हाड यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.
वाद पुन्हा चव्हाट्यावर
जून 2003 साली जेम्स लेनचे 'शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' हे पुस्तक ऑक्सफर्ड प्रकाशनाने प्रकाशित केलं. अनंत दारवटकर, प्रफुल्लकुमार तावडे, रा अ कदम यांनी सर्वात आधी या पुस्तकावर आक्षेप घेतला आणि त्यावर बंदी घालण्याची मागणी केली. पश्चिम महाराष्ट्रात याबद्दल विरोधाचे सूर उमटायला लागले. 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने 2015 मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आणि पुन्हा महाराष्ट्रात वाद पेटला. जितेंद्र आव्हाड यांच्यासह स्वतः शरद पवारांनी पुरंदरेंना पुरस्कार देण्यास विरोध केला. बाबासाहेब पुरंदरेंनी हा पुरस्कार स्वीकारला पण या निमित्ताने महाराष्ट्रात धृवीकरण झाल्याच पाहायला मिळालं. बाबासाहेब पुरंदरेंच काही महिन्यांपूर्वी निधन झाल्यानंतर हा वाद संपेल अशी अपेक्षा होती. परंतु राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका करताना हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आणला आणि दोन्ही बाजूंकडून या बाबतचे दावे-प्रतिदावे पुन्हा एकदा सुरु झाले आहेत.