जालना : जालन्यातील भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यास मी तयार आहे, असं राज्याचे दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले. "अर्जुनाच्या हाती बाण आला की वध दानवाचा होणार," असं म्हणत त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना टोला लगावला.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. त्यामुळे मराठाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरेंनी जालन्याला भेट देऊन तिथे बैठक घेतली. या बैठकीत उमेदवारांची चाचपणी केली. या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अर्जुन खोतकर यांच्या नावाची चर्चा आहे.

भाजपनं मुका घेतला तरी युती शक्य नाही : संजय राऊत

"मी 30 वर्ष निवडणूक लढवत आहे. जालन्यातून सहा वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला शिवसेनेची साथ मिळाल्याने इथे त्यांना फायदा मिळाला होता. परंतु जालन्याचा मतदारसंघ हा शिवसेनेच्या विचारसरणीचा आहे. त्यामुळे इथे शिवसेनाच निवडणूक लढवणार आणि जिंकणार. बाण शिवसेनेचा असेल आणि वध दानवाचा होणार," असं अर्जुन खोतकर म्हणाले.

दरम्यान, मराठवाडाच नाही तर उद्धव ठाकरे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार  आहेत.