Jalna Rain Update : राज्यातील अनेक भागात पावसाने (Rain) पाठ फिरवल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान जालना (Jalna) जिल्ह्यात देखील जून महिना कोरडा गेला असून, अजूनही अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सुद्धा केवळ 10 टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. जिल्ह्यातील 23 प्रकल्पात दहा टक्के, तर 41 प्रकल्पांत मृतसाठा असल्याचं चित्र आहे. त्यामुळे वेळेवर पाऊस झाला नाही तर हे प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात दमदार पाऊस पडेपर्यंत जालनाकरांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.


पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठा पाहता चिंता वाढली आहे. जिल्ह्यात एकूण 64 मध्यम, लघु प्रकल्प आहेत. त्यातील तब्बल 41 प्रकल्पांची पाणी पातळी मृतसाठ्यात गेली आहे. 18 प्रकल्पांत 25 टक्क्यांपर्यंतच उपयुक्त पाणीसाठा आहे. तर 5 प्रकल्पांत 26 ते 50 टक्क्यांपर्यंतच उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण 10.96 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता जिल्ह्यात दमदार पावसाची गरज आहे. अन्यथा जालनाकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.


जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती?



  • जुलै महिना मध्यावधीत आला असला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही.

  • समाधानकारक पाऊस नसल्याने 50 टक्केही खरिपाच्या पेरण्या झालेल्या नाहीत.

  • दुसरीकडे प्रकल्पांतील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे.

  • जिल्ह्यातील 23 प्रकल्पात दहा टक्के, तर 41 प्रकल्पांत मृतसाठा असल्याचं चित्र आहे.

  • ग्रामीण भागातील गावागावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत.

  • टंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून जवळपास 50 टँकर जिल्ह्यात सुरु करण्यात आले होते.

  • परंतु, शासकीय निकषांचे कारण देत 1 जुलैपासून टँकरही बंद करण्यात आले आहेत.

  • पाऊस नाही आणि दुसरीकडे टँकर बंद झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.


अपेक्षित पाऊस झालाच नाही...


जालना जिल्ह्यात पावसाळा सुरु झाल्यापासून आतापर्यंत सर्वदूर जोरदार पाऊस पडला नाही. जिल्ह्यात आजवर किमान 186.28 मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. गतवर्षी याच कालावधीत 254.36 मिमी म्हणजे 31 टक्के पाऊस झाला होता. परंतु, यंदा 124.06 म्हणजे 20.66 टक्केच पाऊस झाला आहे. दरम्यान अपेक्षित पाऊस न झाल्याने याचा परिणाम पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांवर होणार आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर पेरण्या केल्या आहेत. त्यामुळे वेळेवर पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर समोर उभा राहू शकतो.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jalna News: आता हद्दच झाली राव! लाच म्हणून चक्क दारूचे खंबे मागितले; जालन्यातील ग्रामसेवकांवर एसीबीची कारवाई