मुंबई : आयपीएस अधिकारी तुषार दोशींची (IPS Tushar Doshi) पुन्हा बदली करण्यात आली आहे. पुणे सीआयडीमधून (Pune CID)  त्यांना आता पुणे लोहमार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून नेमण्यात आलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीत 1 सप्टेंबर रोजी लाठीचार्ज झाला होता. तेव्हा तुषार दोशीच जालन्याचे पोलीस अधीक्षक होते. त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच त्यांना पुणे सीआयडीचे अधीक्षक म्हणून नेमण्यात आलं. मात्र आज पुन्हा त्यांची बदली करण्यात आली. निलंबनाची मागणी ते सक्तीची रजा त्यानंतर क्रीम पोस्टवर बदली ते पुन्हा लोहमार्ग पोलीस दलातील नियुक्ती या तुषार दोषी यांच्या बदली प्रवासावरुन सध्या चांगलंच राजकारण रंगली आहे. 


  मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या जालन्यातील आंतरवाली-सराटीतील आंदोलनात  गोळीबार घटना झाली.  राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं राजकारण तापले होते.  गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हे आंदोलन त्यातील गोळीबार घटना आणि मनोज जरांगे पाटील हे होते. जालन्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दोशी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यांना क्रीम पोस्टटवर बदली दिली गेली अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली. याबाबतच तक्रार करणारे पत्र सरकारमधीलच मंत्री दिपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले.


केसरकरांच्या पत्रानंतर या बदली प्रकरणात ट्विस्ट


दोषी यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले होते.  दोषी यांची सीआयडीच्या अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आल्यानंतर विरोधकांनी टीका केली. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यानंतर दोषी यांची लोहमार्ग अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली. विरोधकांनी टिका केल्यानंतर आणि दिपक केसरकरांच्या पत्रानंतर या बदली प्रकरणात ट्विस्ट आला खरा पण आता पुन्हा तुषार दोषींची बदली प्रशासकीय बाब असल्याची सफाई सरकारकडून दिली जात आहे.


अधिकाऱ्याची क्रीम पोस्टवर बदली


 अंतरवाली सराटीतील आंदोलनात  लाठीमार झाला. या लाठीमाराचे आदेश नेमके कोणी दिले, हा सस्पेन्स अजूनही सुटलेला नाही. याकरता गृहमंत्र्यांवर राज्याची माफी मागण्याची नामुष्कीही ओढवली. मात्र, तरीही संबंधीत अधिकाऱ्याची क्रीम पोस्टवर बदली ही बाब सरकारला नक्कीच अडचणीत आणणारी ठरली असती. तुषार दोषींच्या चार दिवसांतल्या दुस-या बदलीनंतर या विषयाभोवतीचं राजकारण थांबेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.