प्रेयसी दुसऱ्याशी बोलत असल्याचा राग, तरुणाची आत्महत्येची धमकी
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 13 Aug 2018 01:23 PM (IST)
जळगावातील खान्देश मिल सेंट्रल मॉल परिसरातील बिग बाझारमध्ये काम करणाऱ्या तरुणीशी या तरुणाचे मागील चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
जळगाव : आपल्या वाढदिवसाला प्रेयसीला भेटायला आलेल्या तरुणाने, ती दुसऱ्यासोबत बोलत असल्याचं पाहून बिग बाझारच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जळगावात हा प्रकार घडला. तरुणाला खाली उतरवण्यात पोलिसांना यश आलं आहे. परंतु या प्रकारामुळे पोलिसांना मात्र मोठी कसरत करावी लागली. जळगावातील खान्देश मिल सेंट्रल मॉल परिसरातील बिग बाझारमध्ये काम करणाऱ्या तरुणीशी या तरुणाचे मागील चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तरुणीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने, तिचे इतर कोणासोबत तरी संबंध जुळल्याचा संशय तरुणाला आला होता. वाढदिवस असल्याने हा तरुण तरुणीला भेटायला बिग बाझार इथे गेला होता. मात्र प्रेयसी अन्य एका तरुणासोबत बोलताना त्याला दिसली. या तरुणाशीही तिचे प्रेमसंबंध आहेत, असं त्याला कळलं. यानतंर तरुणाने तिला आत्महत्येची धमकी देत बिग बाझारच्या तिसऱ्या मजल्यावर चढून वीरुगिरी सुरु केली. तसंच आपल्याशी पूर्वीप्रमाणे प्रेमसंबंध ठेवण्याचीही मागणी केली. या प्रकारामुळे मोठा जमाव या ठिकाणी जमला होता. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी तरुणाला बोलण्यात गुंतवून, नंतर त्याला ताब्यात घेतलं.