मुंबई: आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आज राज्यभरात आंदोलन करणार आहे. अमरावती-नागपूर महामार्ग आणि मनमाडमध्ये धनगर बांधव शेळ्यामेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत.

याशिवाय औरंगाबाद, जळगावमध्ये रास्ता रोको तर जालना-औरंगाबाद महामार्गावरील बदनापुरात गोंधळ आंदोलन करण्यात येईल. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरही धरणे आंदोलनाचा इशारा धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे.

धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करण्याची मागणी आंदोलकांची आहे.

धनगर आणि धनगड अशा दोन वेगळ्या जाती असल्याचा सरकारचा दावा आहे. तसं प्रतिज्ञापत्र आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी हायकोर्टात दिलं. मात्र धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. त्यामुळे 1 सप्टेंबरच्या आत ही चूक दुरुस्त केली नाही तर 5 लाख धनगर मिळून औरंगाबादेत एल्गार पुकारतील असा इशारा धनगर समाजाने यापूर्वीच दिला होता.

आघाडी सरकारच्या काळात हा प्रश्न पेटला तेव्हा देवेंद्र फडणवीस स्वत: धनगरांच्या व्यासपीठावर गेले. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न सोडवू असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र 4 वर्ष झाली तरी फडणवीसांनी धनगर आरक्षणाचं घोंगडं भिजत ठेवल्याचा आरोप आहे.

कोणत्या मुद्द्यांआधारे आरक्षणाची मागणी?

- बॉम्बे रजिस्ट्रेशन अक्टमध्ये ‘धनगर’ ऐवजी ‘धनगड’ असा उल्लेख

- प्रत्येक राज्यात उच्चार धनगर असो किंवा धनगड, अर्थ समान असल्याचा दावा

- वर्षानुवर्षे धनगरांचा मेंढीपालनाचा व्यवसाय

- नृत्य, गायन, देव-देवतांसंदर्भात धनगरांची खास संस्कृती

- मानववंश शास्त्र आणि सामाजिक दृष्ट्या धनगर भटकी जमात असल्याचा उल्लेख

- समाजाचा समावेश आदिवासी जमातीत का नाही, असा प्रश्न भटक्या विमुक्तांच्या अभ्यासकांनी केला

- बिहार आणि झारखंडमध्ये धनगरांचा समावेश आदिवासी जमातीत

संबंधित बातम्या   

धनगर आरक्षण: फडणवीससाहेब, त्या आश्वासनाचं काय झालं?

धनगर आरक्षणावर वेळीच लक्ष द्या, नाहीतर तेही रस्त्यावर उतरतील : विकास महात्मे