Maharashtra Nagpur News : सध्या राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलं आहे. राज्यासह काल नागपुरातही अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. काल (मंगळवारी) नागपुरात झालेल्या पावसानं थैमान घातलं. अशातच कालच्या पावसात नागपुरात नुकतंच उद्घाटन झालेल्या इमारतीचं मोठं नुकसान झालं. ही इमारत म्हणजे, नुकतंच उद्घाटन झालेलं पोलीस भवन. 


काही दिवसांपूर्वीच नागपुरात पोलीस भवनाच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. पण काल झालेल्या अवकाळी पावसानं पोलीस भवनातील फॉल सिलिंगच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यामुळे इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी झालेला पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पोलीस भवनाच्या तिसर्‍या चौथ्या आणि सहाव्या माळ्यावर काही ठिकाणी फॉल सीलींग खाली पडलं आहे. सुदैवाने या घटनेत कोणताही पोलीस कर्मचारी जखमी झालेला नाही. 


नागपुरात काल (मंगळवारी) संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामध्ये सिव्हिल लाईन परिसरातील पोलीस भवनात काही ठिकाणी फॉल सीलींग खाली पडलं. विशेष म्हणजे, 29 एप्रिल रोजीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस भवनाच्या इमारतीचा उद्घाटन झालं होतं. नागपूरच्या पोलीस आयुक्तांसह नागपूर जिल्हा पोलीस अधीक्षक या दोघांचं कार्यालयही याच इमारतीत आहे. तसेच नागपुरातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांचं कार्यालयही याच इमारतीत आहे. 


दरम्यान, सुमारे शंभर कोटी रुपये खर्चून पोलीस भवनाची ही भव्य दिव्य इमारत बांधण्यात आली आहे. मात्र पहिल्याच पावसात याचं फॉल सीलींग खाली पडल्यामुळं इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत. पोलीस भवनाच्या इमारतीचं बांधकाम मेहता कन्स्ट्रक्शन कंपनीनं केलं असून आजच्या घटनेसंदर्भात कंत्राटदाराला माहिती देण्यात आली आहे. परंतु, पावसाळा तोंडावर आहे आणि नव्यानं बांधलेल्या इमारतीच्या अशा अवस्थेमुळे सर्वसामान्यांकडूनही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :