शहीद जवान रवींद्र धनावडेंचं पार्थिव त्यांच्या मूळगावात दाखल
एबीपी माझा वेब टीम | 27 Aug 2017 11:01 AM (IST)
पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडे यांना या हल्ल्यात वीरमरण आलं.
पुणे : पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान रवींद्र धनावडेंच पार्थिव त्यांच्या साताऱ्यातील मूळगावी दाखल झालं आहे. धनावडेंचं पार्थिव आज सकाळी श्रीनगरहून पुण्यातील हडपसरमध्ये दाखल झालं. धनावडेंच्या मूळ गावी पार्थिव दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. पठाणकोट आणि उरीसारख्या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मिरमधील पुलवामा पुन्हा एका मोठ्या दहशतवादी हल्ल्यानं हादरलं आहे. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे पाच आणि जम्मू-काश्मिर पोलिस दलातील तीन असे एकूण आठ जवान शहीद झाले. साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडे यांना या हल्ल्यात वीरमरण आलं. शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी पुलवामामधल्या पोलिस वसाहतीवर हल्ला केला. भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.