उस्मानाबाद : अनैतिक संबंधातून एकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक, तसंच राष्ट्रवादीचे नेते भागचंद बागरेचा आणि मंदाकिनी बनसोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक पोलिसांनी शिराढोण पोलिसांच्या मदतीने या हत्येचा उलगडा करत आरोपींना बेड्या ठोकल्या. 26 वर्षीय मंदाकिनी आणि 50 वर्षीय भागचंद यांचं प्रेम इतकं टोकाला गेलं, की त्यांनी 32 वर्षीय बालाजीची हत्या करुन काटा काढला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील मंगरुळमध्ये राहणारे बालाजी बनसोडे हे फेब्रुवारी 2017 पासून गावातून बेपत्ता होते. बालाजी यांचा नाशिकमध्ये खून झाल्याचं उघड झालं आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना एक अज्ञात इसमाची हत्या झाल्याचं आढळलं होतं. डोक्यात दगड घातल्याने मृताचा चेहरा विद्रुप झाला होता. त्यामुळे ओळख पटणं अशक्य झालं होतं. पोलिसांनी हत्या झालेल्या भागातील मोबाईल क्रमांकाचा तपास करुन रहस्य उलगडलं. बालाजी हा मंगरुळ आणि परिसरात करणी, भानामती करणारा भोंदूबाबा म्हणून प्रसिद्ध होता. तो पत्नी मंदाकिनीसह गावात राहत होता. मात्र पिंपळगाव डोळा येथील नरबळी प्रकरणानंतर तो बेपत्ता झाला होता. गावातील गावपुढारी भागचंद बागरेचा यांनी बालाजीला तुझे नरबळी प्रकरणात नाव येईल असे सांगत 'तू नाशिकला जा, मी इथे पाहून घेतो' असा सल्ला दिला. त्यानंतर बालाजी नाशिकला गेला आणि तिथेच बेपत्ता झाला. दरम्यानच्या काळात भागचंद आणि मंदाकिनी यांच्यात प्रेमसंबंध जुळल्याची कुणकुण लागल्याने बालाजीने भागचंद यांना फोन करुन नाशिकला बोलावलं. त्यावेळी भागचंद हे बालाजीची पत्नी मंदाकिनीला सोबत गाडीत घेऊन गेले. सिन्नर येथे मंदाकिनी आणि भागचंद यांच्या अनैतिक संबंधांवरुन बालाजीशी त्यांचा वाद झडला. यातूनच भागचंद आणि मंदाकिनी यांनी बालाजीच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. त्यानंतर दोघंही मंगरुळ या गावी परत आले आणि काही घडलंच नसल्याच्या थाटात वावरत होते. विशेष म्हणजे बालाजी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी कुठेही पोलिसात नोंदवली नव्हती. त्यामुळे तपास करणं अवघड झालं होतं. मात्र पोलिसांनी तब्बल 6 महिने कसून तपास केल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. भागचंद यांनी नाशिकहून स्वतःच्या मोबाईलवरुन एक फोन केला होता त्यावरुन हा हत्या प्रकार उघडकीस आला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलिसांनी या नंबरवरुन उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण पोलिस स्टेशन गाठलं आणि बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली. मात्र बालाजीची नोंद नसल्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं. मात्र शिराढोण पोलिसांनी मंगरुळ गावात चौकशी केल्यावर बालाजी बेपत्ता असल्याचं उघड झालं. मंदाकिनी आणि भागचंद यांच्या अनैतिक संबंधांची गावभर चर्चा होती. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यावर खुनाचा उलगडा झाला.