Jalgaon District Bank Election : जळगावमध्ये जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा परभव करत राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणली आहे. त्यानंतर शनिवारी राष्ट्रवादी कार्यालयात जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. तसेच माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही तोफ डागली आहे. 


जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत आमचा विश्वासघात झाल्याचा आरोप करून भाजप नेते, माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली असून 'गिरीशभाऊ हा विश्वासघात नसून हे तर राजकारण आहे', असा टोला महाजनांना लगावला आहे.


राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा बँक निवडणुकीत विश्वासघात केल्याच्या आरोप केला होता. याबाबत उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी, हे राजकारण असंच असतं. आम्ही काही धर्मार्थ दवाखाने नाही चालवत, असं म्हणत जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांनी 21 उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवायला हवी होती, असा टोला गिरीश महाजन यांना लगावला आहे. 


गिरीश महाजन यांनी दहा कोटी लावले तर मी वीस कोटी लावेल : एकनाथ खडसे 


जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत माजी मंत्री गिरीश महाजन पैसे लावतील म्हणून अनेक उमेदवार हे नाउमेद असल्याचं दिसत होतं, मात्र गिरीश महाजन यांनी दहा कोटी लावले तर मी वीस कोटी लावेल, नाथाभाऊ बसला आहे. तुम्ही फक्त लढा, असं म्हणत नाउमेद असणाऱ्यांना जिल्हा बँक निवडणूक लढायला लावली, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे राष्ट्रवादी कार्यालयात कार्यकर्त्यांशी बोलताना म्हटले आहे.


शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला सुरुवात केली अन् विजय मिळवला : एकनाथ खडसे 


मी दवाखान्यात असतानासुद्धा जिल्हा बँकेत एकही भाजपचा उमेदवार निवडून येऊ देणार नाही, हा शब्द दिला होता आणि योग्य वेळी शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला सुरुवात केली आणि विजय मिळवला, असल्याचंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं. तसेच पुढे बोवताना आगामी काळात राष्ट्रवादी नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्याची बैठक काल (शनिवार) जळगाव येथील राष्ट्रवादी कार्यलयात बोलविण्यात आली होती. त्यावेळेस एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा