Jalgaon District Bank Election : एखाद्या खासदाराला आपला उमेदवारी अर्जही भरता येऊ नये, याला काय म्हणावं? असा सवाल उपस्थित करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना टोला लगावला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याच्या मुद्द्यावरून उठलेल्या वादंगावर गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना हा टोला लगावला आहे. 


दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथेही गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना, "मंत्रीपद अंगाशी यायला नको, याची आपण नेहमीच काळजी घेतो. मंत्रीपद अंगात आलं की, काय काय होतं? हे जिल्हा पाहतोय", असा टोला माजी मंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे नाव न घेता गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. 


दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना कार्यक्रमात उपस्थित असलेले मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना संबोधून जिल्ह्यात साडेचारशे कोटींचा गल्ला आपल्या हातात असून त्याच्या चाव्या तुमच्यामुळे माझ्याकडे असल्याचं वक्तव्यही गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.


...म्हणून जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून रक्षा खडसेंचा अर्ज बाद 


जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नुकतीच अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली होती. या प्रक्रियेनंतर अर्जांची छाननी करण्याचं काम सुरु होतं, या उमेदवारी अर्ज छाननीमध्ये भाजपा खासदार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या त्रुटींमुळे बाद झाल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. खासदार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज निवडणुकी पूर्वीच बाद झाल्यानं भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर रोहिणी खडसे विरूद्ध खासदार रक्षा खडसे यांच्यातील लढत होण्याची शक्यता मावळली असल्यानं आणि समोर आता प्रमुख प्रतिस्पर्धी नसल्यानं रोहिणी खडसे यांच्या समोरील प्रमुख अडथळा दूर झाला असून विजयाचा मार्ग सुकर झाला असल्याचं आता मानलं जात आहे. 


दरम्यान, जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक पुढील महिन्यात होऊ घातली आहे. या निवडणुकी पूर्वीच अनेक रंगतदार गोष्टी यामध्ये दिवसागणिक समोर येत असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काळात एकनाथ खडसे पालकमंत्री असताना त्यांनी सर्व पक्षीय पॅनल तयार करून ही निवडणूक लढविली होती. याच पद्धतीनं जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही ही निवडणूक सर्व पक्षीय लढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेवटच्या क्षणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानं भाजपसोबत निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानं भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असं चित्र निर्माण झालं असल्याचं आता पाहायला मिळत आहे.