मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणेचे मालकच भाजप आहेत. आर्यन खान प्रकरणी जो नवा खुलासा झाला आहे त्यावरुन एनसीबीने (NCB) आरोप फेटाळले आहेत, मात्र चोर स्वतःला कधी आपण चोर असल्याचं म्हणत नाही अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईतील सिनेसृष्टी भाजपला राज्याच्या बाहेर हलवायची आहे, त्यासाठी या सुपाऱ्या वाजत होत्या असं खासदार संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, "सुशांत राजपूत प्रकरणापासून महाराष्ट्रात जणू गांजा, अफू, चरस याचेच पीक निघतय अस चित्र निर्माण केल गेलं. सिनेसृष्टी महाराष्ट्रचे वैभव आहे, त्याला बदनाम केलं जातंय. यासाठी सर्व तपास यंत्रणा हाताशी घेतल्या जात आहेत. दोन ग्रॅम, पाव ग्रॅम ड्रग्ज कुठेतरी पकडतात. गुजरातमध्ये तीन टन ड्रग्स सापडले त्याची बातमी होत नाही."
संजय राऊत म्हणाले की, "आर्यन प्रकरणात गडबड आहे आणि ते पुरावे आता समोर आले. 25 कोटीच्या खंडणीचा हा प्रकार होता का? त्यासाठी क्रूझ प्रकरण निर्माण केले का? रिया चक्रवर्तीकडे तर काहीच सापडले नव्हते. पण सत्य बोलले म्हणजे आम्ही देशद्रोही. आता व्हिडीओ, पुरावे समोर आले आहेत. मुंबई पोलिसांनी यावर कारवाई करावी."
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी SIT स्थापन करावी ही मागणी होत आहे ती योग्यच आहे असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले की, "केंद्रीय यंत्रणाचे आमच्या गळ्यात मारलेले लोंढे बाहेर काढले पाहिजे. ड्रग्सचा अंमल हा नष्ट केला पाहिजे, पण त्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. केंद्राने त्यात हस्तक्षेप करू नये. गुजरातमध्ये ड्रग्ज सापडले त्याचा तपास करणे हे त्यांचे काम आहे. खोटे पंच, खोटे पंचनामे, पंच भाजपशी संबंधित, पंच गुन्हेगार असा प्रकार आहे सगळा. यात पैशाचा व्यवहार झाल्याचं एका पंचानेच उघडकीस आणलं आहे."
दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. मला एका खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. काही अज्ञात लोक माझ्यावर कारवाई करू शकतात असा दावा समीर वानखेडे यांनी पत्रात केला आहे. समीर वानखेडे यांनी हे पत्र अशावेळी लिहिले आहे, जेव्हा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार केपी गोसावी याच्या अंगरक्षकाने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :