जळगाव : जळगावात अंत्ययात्रा नेताना नाल्यावरील पूल कोसळल्याने एकच तारांबळ उडाली. या घटनेत पाच जण नाल्यात कोसळून किरकोळ जखमी झाले. जळगाव शहरात राहणाऱ्या नारायण घुगरे यांची अंत्ययात्रा सुरु असताना हा अपघात घडला.


नारायण घुगरेंचं हृदयविकाराच्या धक्क्याने रविवारी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर शहराबाहेरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. गवळी समाजाच्या वतीने सोमवारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

स्मशानभूमीत जाण्यासाठी लेंडी नाल्याच्या पुलावरुन जावं लागतं. नाला ओलांडून स्मशानभूमीत जाण्यासाठी वीस वर्षांपूर्वी एक लोखंडी पूल बांधण्यात आला होता, मात्र गेल्या काही वर्षांपासून त्याची कोणतीही देखभाल-दुरुस्ती न झाल्यामुळे हा पूल कमकुवत झाला होता.

नारायण घुगरे यांची अंत्ययात्रा नेताना त्या पुलावर एकाच वेळी 30 ते 35 जण आल्यामुळे पूल खचला. पार्थिव खांद्यावर असलेल्या व्यक्तींची चांगलीच तारांबळ उडाली. पूल हळूहळू खचत गेल्याने अनेकांना स्वतःला सावरता आलं. मात्र पाच जण नाल्यात पडून किरकोळ जखमी झाले. पूल आणि नाल्यातील अंतर केवळ आठ ते दहा फुटांचे असल्यामुळे कोणाला गंभीर दुखापत झाली नाही.