जळगाव : राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एकाच मंचावर हजेरी लावल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 'नाथाभाऊंनी कानात काय सांगितलं, हे मी सांगणार नाही, नाहीतर भाजपवाल्यांना झोप लागणार नाही' अशा कानपिचक्या यावेळी अजित पवारांनी लगावल्या.
जळगावात राष्ट्रवादीच्या आमदाराच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला खडसे आणि अजित पवार उपस्थित होते.
'नाथाभाऊ, तुमच्यावर अन्याय होत असल्याचं बघवत नाही, तुम्ही आमच्या पक्षात या आणि आमचे नेते व्हा', असं आवाहन जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतिश पाटील यांनी केलं.
'खडसे आणि अजितदादा एका मंचावर आहेत. पण जे तुमच्या मनात आहे ते माझ्या नाही, माझ्या मनात जे आहे ते मी अजितदादाच्या कानात सांगितलं', असं खडसे म्हणताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली.
'नाथाभाऊंनी कानात काय सांगितलं, हे मी सांगणार नाही, नाहीतर भाजपवाल्यांना झोप लागणार नाही' अशा कानपिचक्या अजित पवारांनी लगावल्या.
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ. सतीश पाटील यांचा साठावा वाढदिवस आज जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयात साजरा झाला. यानिमित्ताने सर्वपक्षीयांच्या वतीने त्यांचा गौरव सोहळा झाला.
या सोहळ्याला अजित पवार आणि एकनाथ खडसे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटीलही यावेळी हजर होते.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपला घरचा आहेर देत आले आहेत. त्यामुळे अजित पवारांसोबत एकाच मंचावर खडसे आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.