कोल्हापूर : दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत, चेअरमन सर्जेराव पाटील यांच्या हस्ते गुळाच्या सौद्यांना आज प्रारंभ झाला. गुळाला प्रतिक्विंटल 5000 ते 5600 रुपये इतका दर मिळाला आहे.


गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर 1200 ते 1500 रुपयांनी जास्त आहे. मिळालेल्या दरामुळं शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे. हा दर असाच टिकून राहावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी प्रथमच चॉकलेटच्या स्वरुपात सचिन पाटील या तिरपण गावातील शेतकऱ्याने आठ ग्रॅमपर्यंतच्या गुळाच्या वड्या तयार केल्या आहेत, त्याचंही उद्घाटन करण्यात आलं.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दरवर्षी कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाचे सौदे पार पडतात. कोल्हापूर जिल्हा हा गूळ उत्पादनात अग्रेसर आहे. गुळाच्या शुद्धतेमुळे कोल्हापुरी गूळ हा सातासमुद्रापार पोहोचला आहे.