नांदेड : मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद जवळ छोट्याशा बामणी गावातील इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीसमध्ये (ITBP) कार्यरत असिस्टंट कमांडन्ट सुधाकर शिंदे आज देशाची सेवा करताना धारातिर्थी पडले. हा हल्ला आज 20 ऑगस्ट रोजी नक्षलवाद्यांनी घात लावून केला. या हल्यात पंजाब येथील गुरमुखसिंघ यांचाही देह देशाच्या कामी आला.


नांदेड जिल्ह्यातील बामणी ता. मुखेड या गावचे सुधाकर शिंदे हे सन 2000 मध्ये परभणी येथील कृषी विद्यापीठातून कृषी पदवी प्राप्त करून सन 2001 मध्ये आयटीबीपीमध्ये सब इन्सपेक्टर या पदावर रुजू झाले होते. महाराष्ट्राची शान वाढवत त्यांनी हळूहळू सहाय्यक समादेशक (असिस्टंट कमांडन्ट) या पदापर्यंत पदोन्नती मिळवली होती. सन 2019 मध्ये त्यांची नियुक्ती छत्तीसगड राज्यात नक्षल प्रतिबंधक पथकात झाली.


आज 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास नक्षलवाद्यांनी घात लावून केलेल्या हल्यात सुधाकर शिंदेसह एएसआय गुरमुखसिंघ हे दोन अधिकारी धारातिर्थी पडले आहेत. नक्षलवाद्यांनी दोन बुलेटप्रुफ जॅकेट, एक वायरलेस सेट, एक एके 47 रायफल आणि गोळ्या लुटून नेल्या आहेत. महाराष्ट्राच्या एका शूरवीराने नक्षलवाद्यांशी लढताना आपला जीव देशासाठी अर्पण करून एक आदर्श दाखवला आहे. त्यांचे पार्थिव विमानाने उद्या नांदेड येथील गुरू गोविंद सिंगजी विमानतळावर दाखल होणार असून मुखेड तालुक्यातील बामणी या गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या या अकाली जाण्याने मात्र बामणी गाव परिसरात शोककळा पसरली आहे.






मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून श्रद्धांजली
नांदेडचे सुपूत्र व आयटीबीपीचे असिस्टंट कमांडन्ट सुधाकर शिंदे यांना छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण आल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. संपूर्ण देश शिंदे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. शहीद सुधाकर शिंदे अमर रहे!, असे ट्विट मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.