सांगली : सांगलीत मोबाईलच्या हेडफोनने निलेश शिंदे या आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा बळी गेला आहे. कानात हेडफोन घालून रेल्वे रूळावरून स्थानकाकडे जाताना मागून येणाऱ्या भरधाव रेल्वेची धडक बसल्याने तो जागीच मृत्यू झाला.
माधवनगर रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कॅम्पसमध्ये (आयटीआय) आज दुःखद वातावरण होते. शिवाय संस्थेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मोबाईल आणि हेडफोन न वापरण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. कारण फक्त एकच होते. या संस्थेत पहिल्या वर्षात शिकणारा आणि कालपर्यंत मित्रांमध्ये वावरणारा निलेश आज त्यांच्यात नव्हता.
हेडफोनच्या नादात आपला जीव गमावलेल्या आणि अवघ्या काही सेकंदात घडलेला हा प्रकार त्याच्या मागे असलेल्या मित्रांनी पाहिला होता.
निलेशच्या या मृत्यूची आयटीआय संस्थेने गंभीर दखल घेत आजपासूनच संस्थेच्या कॅम्पस मध्ये मोबाइल वापरावर बंदी आणत हेडफोनचा मोह टाळण्याविषयी मार्गदर्शन केले जाते आहे. यासाठी संस्थेने आज शोकसभा घेत विद्यार्थ्यांना मोबाईल आणि हेडफोन न वापरन्याविषयी सूचना दिल्या आहेत.
निलेशला वाचवण्याचा त्याच्या मित्रांनी अतोनात प्रयत्न केला. जीवाचा आकांत करून त्याला वाचवण्यासाठी पळाले, हाका मारल्या, प्रसंगी दगड मारले पण निलेशच नशीब बलवत्तर नव्हतं. तो दगड त्याला लागला नाही आणि मागून आलेल्या रेल्वेने निलेशला धडक दिली आणि आई-वडिलांना एकुलता एक असलेल्या निलेश एका क्षणात आई- वडिलांना पोरका करून गेला.
रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झालेल्याचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यात आता कानात हेडफोन घालून गाणी ऐकत ट्रॅकवरून जाण्याचे फॅड तरुण वर्गामध्ये जास्त आहे. निलेश देखील यालाच बळी पडला आणि कोवळ्या वयात त्याने आपली जीवनयात्रा संपवली.