सांगली : सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांचे पुत्र पृथ्वीराज पवार यांना इस्लामपूर न्यायालयाने तीन महिन्याची शिक्षा सुनावली आहे. वाळवा तालुक्यतील सर्वोदय साखर कारखान्याचा मालकी हक्क आणि आमदार जयंत पाटील यांची मानहानी केल्याप्रकरणी पृथ्वीराज पवार यांना ही शिक्षा सुनावली आहे.


2012 मध्ये पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन वाळव्यातील सर्वोदय सारखर कारखान्याचा मालकी हक्कावरुन सुरु असलेल्या वादातून आमदार जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे राजारामबापू कारखान्याने न्यायालयात पवार यांच्याविरोधात खासगी याचिका दाखल केली होती.

त्यावर निकाल देताना न्यायालयाने पृथ्वीराज पवार यांना तीन महिने सश्रम कारावास आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती श्रीमती व्ही.बी. सुपेकर यांनी ही शिक्षा ठेठावली आहे. तसेच, दंड भरला नाही, तर एक महिना कारावास वाढवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, न्यायालयाने या निकालाला आव्हान देण्यासाठी15 दिवसांची मुदतही दिली आहे. पण ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी कोर्टाच्या या निर्णयामुळे पवार गटाला धक्का बसल्याची चर्चा सांगली जिल्ह्यात सुरु आहे.