नागपूर : नागपूर... मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाची धुरा संभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं शहर. मात्र याच नागपूरची तुलना आता बिहारशी केली जात आहे. कारण नागपुरातील चिरकुट गुंडही खिशात गावठी कट्टा घेऊन फिरतो आणि वाटेल त्यावर गोळीबार करतो.



6 सप्टेंबरला ऍक्टिव्हावरुन आलेल्या हल्लेखोराने एकनाथ निमगडे यांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेला आठवडाही उलटत नाही तोच, 12 सप्टेंबरला यासिन कुरेशी नावाच्या इसमावर गोळीबार झाला. आठवडाभरात दोन गोळीबाराच्या घटनांमुळे, नागपुरातील अवैध शस्त्रांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



नागपुरात नोंदणीकृत पिस्तुलांची संख्या 2 हजार 5 इतकी आहे. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपुरात 5 हजार अवैध शस्त्र दाखल झाली आहेत. त्यामध्ये मध्यप्रदेश आणि उत्तरेकडच्या राज्यातून आलेल्या गावठी कट्ट्यांचा समावेश जास्त आहे.



गेल्या 9 महिन्यांत शस्त्र कायद्याखाली पोलिसांनी तब्बल 300 गुन्हे दाखल केले आहेत. ज्यात 25 पिस्तुलं जप्त करण्यात आली आहेत. या सगळ्या आकडेवारीवर नजर टाकल्यानंतर, पोलिसांची कारवाई किती अपुरी पडत आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.



गुन्हेगार पोलिसांच्या, पर्यायाने देवेंद्र फडणवीसांच्या नाकावर टिच्चून हत्या, दरोडे, लूटमार असे गुन्हे करत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नागपुरातली अवैध शस्त्रांची वाढलेली आवक त्याचचं द्योतक म्हणावं लागेल. थोडक्यात काय तर, नागपुरात गुंडांचे अच्छे दिन आले आहेत.