अहमदनगर : 2019 साली परिवर्तन होणार आहे. राष्ट्रवादीचं सरकार येईल आणि अजित पवार प्रमुख असतील, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या शाखेच्या उद्घटनावेळी बोलत होते.
2019 साली राष्ट्रवादीचं सरकार येऊन, अजित पवार प्रमुख असतील, असा दावा करुन धनंजय मुंडेंनी नव्या चर्चांना सुरुवात करुन दिली आहे. अजित पवार प्रमुख असतील म्हणजेच अजित पवार हे राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का, असे प्रश्न उपस्थित करुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
यावेळी धनंजय मुंडे यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मोदींच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडवत, काळा पैसा, स्वच्छता अभियान, महागाईवर सरकारला धारेवर धरलं.
मुख्यमंत्र्यांवरही धनंजय मुंडेंनी जोरदार टीका केली. “भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक सरकार म्हणत आहेत. मात्र फडणवीस यांनी 2014 साली आमच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र सत्तेत तीन वर्षे असून आतापर्यंत आरोप सिद्ध झाले नाहीत. फक्त चर्चा करुन वातावरण तापवलं. मात्र तीन वर्षात फडणवीस सरकारच्या 11 मंत्र्यांचे पुरावे दिले, मात्र फडणवीसांनी त्यांना क्लीन चीट दिली.”, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
साडे तीन वर्षांपासून नागरिक ‘अच्छे दिन’ची वाट पहात आहेत. मात्र अच्छे दिनची गावागावात चेष्टा होऊ लागल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच ‘अच्छे दिन’चं हाडूक गळ्यात अडकल्याचं म्हटलं. विदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाला 15 लाखांचं अश्वासन दिलं. मात्र जनता अजूनही पैशाची वाट पहात असल्याचं मुंडे यांनी म्हटलं.
विरोधात असताना भाजपवाले महागाईच्या गप्पा मारत होते. पेट्रोल 55 वरुन 80 वर गेलंय. गॅस, डाळीचे भाव गगनाला भिडलेत. मात्र पंतप्रधान ‘मन की बात’मधून दर कमी होईल हे सांगत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
धान्य महाग झाल्यावर पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 6 कोटी शौचालयांचं अश्वासन दिलं. मात्र खायला अन्न नसून जनता उपाशी मरत आहे. खाये इंडिया तो ही जाये इंडिया, असं म्हणत खायलाच अन्न नसताना शौचालयाचं स्वप्न दाखवल्याचा आरोप त्यांनी केला.
अजित पवार 2019 साली राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Nov 2017 10:39 AM (IST)
साडे तीन वर्षांपासून नागरिक ‘अच्छे दिन’ची वाट पहात आहेत. मात्र अच्छे दिनची गावागावात चेष्टा होऊ लागल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -