बीड : सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली. बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी शिवाजीराव पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर टीकेची झोड उठवली.

काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित आणि त्यांचे वडील शिवाजीराव पंडीत यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला. मात्र, वारंवार होणाऱ्या पराभवामुळे सत्तेचा दुरुपयोग करुन पकंजा मुंडे खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की, “शिवाजीराव पंडित हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेतृत्व आहे. त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करावा हे अतिशय दुर्दैवी आहे. एखाद्यानं सत्तेची मस्ती डोक्यात घेण्याचं हे द्योतक आहे. बीड मधील जनता सत्तेची ही मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही.”

“जिल्ह्यात अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागत आहे. बीडमधील जनता भाजपच्या पालकमंत्र्याविरोधात रस्त्यावर उतरुन आक्रोश व्यक्त करत आहे. त्यामुळे एखादं जुनं प्रकरण काढून पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करायचा हे राजकारण बंद करावं.” असा इशारा धनंजय मुंडेंनी यावेळी दिला.