सोलापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एजंटाकरवी चालणारा IPL सट्ट्याचं रॅकेट सोलापूरच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. यामध्ये सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकूण 4 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 38 लाख 44 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. मोबाईलद्वारे हा सगळा सट्टा सुरु होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगार यांनी दिली.
पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सोलापुरातील अवंतीनगर भाग 2 येथील पर्ल हाईटसच्या एका फ्लॅटमध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी चेतन रामचंद्र वन्नाल आणि विग्नेश नागनाथ गाजूल हे दोघेही IPL च्या मॅचेसवर सट्टा घेत असल्याचे आढळून आले. IPL चा सामना सुरु असताना टीव्हीवर चालू क्रिकेट मॅच पाहत, टॉस कोण जिंकेल, 6, 10, 15 आणि 20 ओव्हर्समध्ये कोणता संघ किती धावा काढेल, शेवटी सामना कोणती टीम जिंकेल यावर मोबाईलद्वारे दररोज सट्टा लावणाऱ्या इसमांकडून फोनवर सट्टा घेऊन त्याचा हिशोब लिहीत असताना आढळून आले.
या आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता या सट्ट्याचे धागेदोरे कर्नाटकात देखील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कर्नाटकातील कलबुर्गी (गुलबर्गा) येथील बसवेश्वर नगर परिसरातील एका घरावर छापा टाकला. या ठिकाणी सोलापुरात राहणारे दोघे आरोपी सट्टा चालवत असल्याचे उघडकीस आले. आरोपी अतुल सुरेश शिरशेट्टी आणि प्रदिप मल्लय्या कारंजे असे कर्नाटकातून ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींचे नाव आहे. या आरोपींकडून 3 लॅपटॉप, 1 टॅब, 13 मोबाईल हॅंडसेट, 1 माईक, 1 हॉटलाईन सेट, मोडेम, टीव्ही, डीव्हीआर असा अंदाजे 3 लाख 33 हजार 200 रुपयांचे साहित्य तसेच गुन्ह्यात वापरलेली अंदाजे 30 लाख रुपये किमतीचे वाहने, सट्टा खेळण्यासाठी लागणारे काही रोख रक्कम असे एकूण 38 लाख 44 हजार 200 रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
सर्वसामान्य माणसाला जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून हा सगळा सट्टा सुरु होता. जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरुन ह्या गुन्ह्यात आणखी कोण-कोण आरोपी सहभागी होते याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरात IPL वर सट्टा सुरु असल्याची चर्चा सुरु होती. गुन्हे शाखेने कमालीची गुप्तता पाळत महाराष्ट्र आणि कर्नाटकात चालणारा हा सट्टा रॅकेट उद्वस्त केलं. या आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5 सह 420, 109, 269, 336, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2005 चे कलम 66 डी सह आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना न्यायलयात हजर केले असता न्यायलायने त्यांना पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली. पोलीस आय़ुक्त अंकूश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहा. पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे, उपनिरीक्षक संदिप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.