Ashish Shelar on IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी केवळ पाच दिवस शिल्लक राहिले असताना आशिष शेलार यांनी आयपीएलसंदर्भात विधानसभेत मोठा मुद्दा उपस्थित केलाय. या हंगामातील सर्व सामने महाराष्ट्राच्या वानखेडे, ब्रेबॉन, डि.वाय पाटील या स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. हे सामने पाहण्यासाठी शासनानं 25 टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रेवश देण्याची परवानगी दिलीय. राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपकडून विरोध दर्शवण्यात आलाय. आशिष शेलार यांनी 25 टक्क्यांएवजी 50 टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्यात यावा अशी मागणी केलीय. 


कोरोनाचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारनं 25 टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रेवश देण्याचा निर्णय घेतलाय. परंतु,  स्टेडियमची क्षमता पाहता तसेच त्यातील काही जागा शासनाला द्याव्या लागत असल्याने सर्वसामान्य प्रेक्षकांना अत्यअल्प जागा उपलब्ध होतील. त्यामुळं एमसीएच्या वतीनं याबबात क्षमता वाढवून देण्याची मागणी करण्यात येत असून शासनानं 25 टक्के ऐवजी 50 टक्के क्षमतेची परवानगी देण्याबाबत विचार करावा, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. तसेच मुंबईतील ओव्हल मैदान, आझाद मैदान या मैदानावर नवे खेळाडू तयार होतात. पण या मैदानांचील खेळपट्टयांची लिज संपली असून शासनानं लिजचं तातडीनं नुतनिकरण करावं अशी मागणी त्यांनी केली. 


यंदाचा हंगामही प्रेक्षकांविना होण्याची शक्यता
दरम्यान, चीन, दक्षिण कोरियासह युरोपियन देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्रालाही सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. महाराष्ट्र सरकारनं याआधी 25 टक्के प्रेक्षकांसह आयपीएलच्या सामने खेळण्यास परवानगी दिली. पण येत्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढल्यास राज्य सरकारकडून परवानगी रद्द केली जाऊ शकते. यामुळं आयपीएलचा पुढचा हंगामाही प्रेक्षकांविना खेळला जाणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यंदा आयपीएलमधील सर्व साखळी सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात खेळवले जाणार आहेत.


आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रातच!
आयपीएलच्या आगामी पंधराव्या मोसमासाठी बीसीसीआय सज्ज झालंय. येत्या 26 मार्च ते 29 मे या कालावधीत आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचं आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या मोसमातल्या 74 पैकी 70 साखळी सामन्यांचं आयोजन मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात करण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये यंदा दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं यंदाच्या मोसमापासून आठऐवजी दहा संघ खेळणार आहेत. या दहा संघांची 'अ' आणि 'ब' अशा गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ आपल्या गटातल्या संघांसोबत एकेक सामना आणि दुसऱ्या गटातल्या संघांसोबत प्रत्येकी दोन सामन्यांमध्ये खेळणार आहे. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. त्यामुळं संघांची संख्या वाढली असली तरी सामन्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न दिसून येत आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha