Nagpur News : एका बाळाच्या अपहरणाच्या तपासापासून सुरु झालेले प्रकरण आतापर्यंत सात बाळांच्या अपहरण आणि विक्रीच्या खुलाशापर्यंत पोहोचले आहे. नागपुरातील दाम्पत्याच्या दाव्यानंतर पोलीसही चक्रावले. बाळ अपहरण आणि विक्री प्रकरणी आंतरराज्यस्तरीय टोळी सक्रिय असल्याचे पुढे आले आहे. नागपुरात लहान मुलांचे अपहरण करुन त्यांची लाखो रुपयांमध्ये विक्री करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचे काही घटनांवरुन समोर आले आहे. एका आठ महिन्याच्या मुलाच्या अपहरणानंतर नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) तपासात आतापर्यंत सात मुलांच्या अपहरण आणि विक्रीचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या तीन प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक केली आहे.


पोलिसांच्या तत्परतेने चिमुकल्याची सुटका


आईच्या कुशीत विसावलेला हा आठ महिन्याचा चिमुकला जितेश निषाद. दहा नोव्हेंबर रोजी निषाद कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या योगेंद्र आणि रिटा प्रजापती या दाम्पत्याने जितेशचे अपहरण केले आणि अडीच लाख रुपयांमध्ये काही मध्यस्थांच्या माध्यमातून नागपुरातील एका निपुत्रिक कुटुंबाला विकले. निषाद दाम्पत्याने मुलाच्या अपहरणाची तक्रार देताच पोलिसांनी अवघ्या पाच तासात जितेशला सुखरुप आई-वडिलांच्या स्वाधिन केले. या प्रकरणी पोलिसांनी प्रजापती दाम्पत्याकडून मूल घेऊन पुढे विक्रीमध्ये मध्यस्थाची भूमिका निभावणाऱ्या चौघांना अटक केली होती.


प्रजापती दाम्पत्य फरार


पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच प्रजापती दाम्पत्य फरार झाले होते. नंतर तीन दिवसांनी दोघांना राजस्थानमधील कोटामधून पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दोघांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. प्रजापती दाम्पत्याने पोलिसांना सांगितले की त्यांनी याच पद्धतीने आणखी तीन मुलांची दीड ते अडीच लाख रुपयांमध्ये विक्री केली आहे. तसेच अटकेच्या वेळी त्यांच्याजवळ असलेले आणखी दोन मुलंही ते विकण्याच्या तयारीत होते. मात्र हे पाचही मुलं आमची स्वतःची अपत्य असून गेल्या पाच वर्षात प्रत्येकी दहा महिन्याच्या अंतरात मार्च 18, फेब्रुवारी 19, मार्च 20, फेब्रुवारी 21, फेब्रुवारी 22 मध्ये ही पाच ही मुलं एक एक करून आमच्याकडे जन्माला आली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या याच दाव्याची तपासणीसाठी आता पोलिसांनी वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जितेशच्या विक्रीमध्ये ज्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी ही आणखी दोन मुलाची अशाच पद्धतीने विक्री केल्याचे तपासात उघड झाल्यानंतर विक्री करण्यात आलेली ही सर्व पाचही बालक वेगवेगळ्या शहरातून नागपुरात आणण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे.


चार दिवसांच्या बाळाची अडीच लाखांत विक्री


दरम्यान या टोळीच्या शिवाय शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशाच पद्धतीने अवघ्या चार दिवसांपूर्वी जन्मलेल्या एका बाळाच्या विक्रीचे प्रकरण समोर आले आहे. एका गरीब गर्भवती महिलेला आश्रय देऊन तिचे बाळंतपण केल्यानंतर आश्रय देणाऱ्या राजश्री सेन नावाच्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांनीच या बाळाची विक्री केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्या बाळाला सुमारे दोन लाख रुपयांमध्ये तुळजापूरला विकण्यात आले असून तो बाळही नागपुरात परत आणण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे. लहान बाळांचे अपहरण आणि नंतर त्यांची लाखो रुपयांमध्ये विक्रीच्या या तीनही प्रकरणात पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली आहे. तसेच प्रजापती दाम्पत्य गेल्या काही महिन्यात भंडारा, गोंदिया, नागपूर, बालाघाट, छिंदवाडासह ज्या ज्या ठिकाणी भाड्यावर राहिले आहे. त्या त्या ठिकाणीही पोलिसांनी तपास सुरु केल्यामुळे या प्रकरणाचे धागेदोर इतर राज्यांपर्यंतही जाणार आहेत. त्यामुळे पुढे अनेक धक्कादायक पैलू समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


ही बातमी देखील वाचा


आधी 'सी समरी रिपोर्ट' रद्द करा, मग नव्यानं तपास सुरू करा; शिखर बँक घोटाळ्याविरोधातील याचिकाकर्त्यांची कोर्टाकडे मागणी