रत्नागिरी : आयुष्य! यश - अपयश, सुख-दु:ख, अपघात- घातपात यांनी भरलेलं एक रांजण म्हटलं तर वावगं ठरू नये. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढ - उतार घडत असतात. चांगल्या, वाईट गोष्टींचा प्रत्येकाला अनुभव येतो. काही जण यामध्ये खचून जातात. तर, काही जण याच आव्हानांना संधी समजत त्यातून आपल्या जगण्याचा मार्ग निवडतात आणि त्यातून आपलं वेगळेपण देखील सिद्ध करतात. काहीजण आपल्या परिस्थितीचं भांडवल देखील करताना आपण सर्वांनी पाहिलं असेल. पण, काहीजण याला अपवाद देखील ठरतात. अनेकांची कामगिरी,परिस्थिती आणि त्यांचा जीवनप्रवास हेवा वाटावा, थक्क करणारा देखील असतो. काहींना आपण सहानुभूतीपूर्वक देखील वागणूक देतो. तसं पाहायाला गेलं तर 'अपंग' हा शब्द आपल्याला बरंच काही सांगतो. परिस्थितीतीशी झगडत, त्यावर मात करत अनेकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशाच एका अपंग बांधवांपैकी एक म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावचे श्रीपत जवरत. श्रीपत यांचा एक पाय लहानपणी झालेल्या अपघातात गमवावा लागला. असं असलं तरी श्रीपत एका पायानं देखील उंचच उंच झाडांवर चढतात. मग ते झाड कोणतंही असो. मागील 40 वर्षे श्रीपत जवरत याच जीवावर आपला उदरनिर्वाह करत आहेत. यावेळी त्यांच्याकडून एकदाही चूक झाली नाही हे विशेष! श्रीपत यांना केवळ आसपासच्याच भागातून नाही तर जिल्ह्याच्या अनेक भागातून झाडं साफ करण्यासाठी बोलावणं येतं. श्रीपत यावेळी योग्य मोबदल्याच्या बदल्यात संबंधिताकडे कामाला जातात. सध्या श्रीपत यांनी वयाची साठी ओलांडली आहे. सध्या पहिल्याप्रमाणे शरीर साथ देत नाही. पण, त्यानंतर देखील त्यांचं हे काम सुरूच आहे.
त्या दिवशी नेकमं काय झालं?
''तो दिवस मला आजही चांगला आठवतो. गावांगावांमध्ये विज येऊ घातली होती. त्याकरता वायर खेचण्याचं काम सुरू होतं. मी माझ्या काही मित्रांसोबत खेळण्यासाठी म्हणून गेलो होतो. आम्ही त्यावेळी लपाछपी खेळत असू. मला पहिल्यापासून झाडावर चढण्याची आवड असल्यानं मी विजेच्या खांबावर चढलो. त्यावेळी त्यावेळी माझा स्पर्श विजेच्या तारांना झाला. सुरूवातीला विद्युत प्रवाह सुरू नव्हता. पण, त्यानंतर विद्युत प्रवाह सुरू झाला आणि मी त्याठिकाणी जवळपास दोन तास चिकटून होतो. सुदैवानं वाचलो. मला बांबुच्या सहाय्यानं बाजूला करत जवळच्या दवाखान्यात नेण्यात आलं. पण, त्याला फार उशिर झाला होता. मी माझा एक पाय गमवला होता.'' त्या दिवसाबद्दल एबीपी माझाशी बोलताना श्रीपत यांच्या डोळ्यासमोर त्या दिवशीचा सारा घटनाक्रम झराझरा पुढे सरत होता. हे सारं कथन करत असताना त्यांचा आवाज काहीसा घोगरा झाला. वयानुसार त्यांच्या बोलण्यामध्ये देखील काहीसा थकवा जाणवत होता. पण, असं असलं तरी काही काळानंतर मी मात्र झाडांवर चढू लागलो. सर्वांना विश्वास बसला आणि मला परिसरातून किंवा अगदी लांबच्या ठिकाणाहून देखील बोलावणं येऊ लागलं. मी बिनधास्तपणे कोणत्याही झाडावर, कितीही उंच झाड असलं तरी त्यावर चढतो आणि त्याची साफसफाई करतो. मागील 40 वर्षापासून मी हे सारं करत आहे. चिरवेळ विश्रांती घेतलेले श्रीपत पुन्हा बोलू लागले होते.
घराच्यांचं काय म्हणणं?
याचा अपघात झाला तेव्हा आई - बाबा आणि आम्ही सारं शेतात होतो. यानंतर काही वर्षे अशीच गेली. यावेळी अनेक जण त्याला झाडावर चढण्याकरता त्याला बोलावण्याकरता येऊ लागल्या. त्यावेळी आम्हाला याचा सुगावा लागला. आम्ही त्याला हे नको करू असं समजावलं. पण तो ऐकेना. श्रीपत यांच्या मोठ्या भावानं अर्थात विठ्ठल जवरत यांनी 'एबीपी माझा'कडे दिलेली ही प्रतिक्रिया. सध्या विठ्ठल यांचं वय देखील आला जवळपास सत्तरीला येऊन ठेपलं आहे. आमचं कुटुंब मोठं आहे. अपंग असल्यानं त्यांना कुणी मुलगी दिली नाही. पण, ते आम्हाला कधीच ओझं वाटले नाहीत. ते मेहनत करतात. त्यांच्या कमाईचा हिस्सा ते घरात देतात. ते अपंग असले तरी ते तसं कधी वागले नाहीत. जी गोष्ट त्यांना करणं शक्य नाही त्या गोष्टींमध्ये आम्ही त्यांना मदत करतो. पुतणे त्यांना आपले मानतात आणि ते पुतण्यांना. श्रीपत यांच्या वहिणी सरिता जवरत यांनी 'एबीपी माझा'कडे दिलेली ही प्रतिक्रिया खूप काही सांगून जात होती.
'परिस्थितीचं केव्हा भांडवलं केलं नाही'
याबद्दल 'एबीपी माझा'नं काही गावकऱ्यांशी देखील चर्चा केली. 'श्रीपत यांना मी लहानपणापासून पाहत आहे. सध्या माझं वय 40 वर्षे आहे. हा माणूस रोज मेहनत करतो. अगदी लांबवरून त्यांना बोलावण्याकरता माणसं येतात. सध्या वयोमानानुसार त्यांना काही अडथळे येतात. पण, अद्याप देखील थांबण्याचं ते नाव घेत नाहीत. किमान माझं सारं सुरळीत आहे, शरीर साथ देईल तोवर मी झाडांवर चढणार अशी प्रतिक्रिया श्रीपत देतात. 40 वर्षे मी यांना पाहत आहे. पण, परिस्थितीचं भांडवल यांनी केव्हा केल्याचं मी पाहिलं नाही. तुरळ गावचे पोलिस पाटील आणि नागरिक संजय ओकटे यांनी दिलेली प्रतिक्रिया. यावेळी गावातील प्रत्येक जण श्रीपत यांच्या कौशल्याचं तोंड भरून कौतूक देखील करतात.