धुळे : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सर्व प्रकारच्या एसटीच्या तिकीट दरात 18 टक्के दरवाढीच्या निर्णयाची आज (15 जून) मध्यरात्रीपासून अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या बसचं तिकीट महागणार आहे.


या दरवाढीच्या योग्य अंमलबजावणीसाठी 15 ते 18 जून या कालावधीत एसटीच्या अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून मुख्यालयात हजर राहण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.

डिझेलचे वाढते दर तसेच एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचं एसटी महामंडळाने म्हटलं आहे.

याचबरोबर यापुढे तिकीटाची भाडे आकारणी ही पाच रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला. उदाहरणार्थ, एखाद्या प्रवासाचे तिकीट सात रुपये असेल तर त्याऐवजी पाच रुपये आकारले जातील. तसेच आठ रुपये तिकीट असल्यास 10 रुपये तिकीटदर आकारला जाईल.

सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांदरम्यान नेहमी वादावादी होते. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटणार असून ही वादावादी थांबेल, असं एसटी महामंडळाने म्हटलं आहे.