Maharashtra Rain News : राज्यातील काही भागात जोरदार परतीचा पाऊस (Rain) पडत आहे, तर काही भागात पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, काही भागात सुरु असलेल्या पावसाचा शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसला आहे. दरम्यान, पावसाबाबात जेष्ठ हवामान अभ्यासक माणिकारव खुळे (Manikrao Khule) यांनी माहिती दिली आहे. उद्यापासून (12 ऑक्टोबर) राज्यात पाऊस उघडीप देणार असल्याचा अंदाज खुळे यांनी वर्तवला आहे. 


पुढील पाच दिवस कसं असेल हवामान?


पुढील 5 दिवस म्हणजे मंगळवार 16 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा 18  जिल्ह्यात व विदर्भात 13 ते 15 ऑक्टोबर (3 दिवस) 11 जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना वाफसा असेल त्या शेतकऱ्यांनी पावसाची विशेष भीती न बाळगता शेतीची काम उरकण्यास हरकत नसल्याचे मत खुळे यांनी व्यक्त केले. 


17 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता


बुधवार दिनांक 17 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात पुन्हा काहीसं पावसाळी वातावरण चित्रित होण्याची शक्यता जाणवते. शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा बियाणं 12 ऑक्टोबर नंतरच टाकण्यास हरकत नसल्याचे खुळे म्हणाले. 12  किंवा 18  ऑक्टोबर नंतर जरी किरकोळ पाऊस झाला तरी हुळं उताराला विशेष अपायकराकता जाणवणार नाही. 


परतीचा मान्सून जाग्यावरच


5 ऑक्टोबरला परतीच्या वाटेवरील मान्सून अजूनही केवळ महाराष्ट्र राज्याच्या उंबरठ्यावर म्हणजे नंदुरबार पर्यंत येऊन थांबलेला आहे. आज सप्ताह उलटला तरी अजुन तो नंदुरबारमध्येच उभा आहे. अर्थात त्याच्या पुढील वाटचालीस अनुकूलता असली तरी प्रत्यक्षात जेव्हा तो जाग्यावरून हलेल, तेव्हाच महाराष्ट्रातील परतीच्या पावसाबाबत बोलणं योग्य ठरेल असे माणिकराव खुळे म्हणाले.


सध्याच्या वातावरणानुसार महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता नाही


माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या वातावरणानुसार महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता नाही. त्यामुळं गारपीटीबाबत पसरवल्या जाणाऱ्या व शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण करणाऱ्या बातम्याकडे दुर्लक्ष करावे, असे खुळे म्हणाले. 


गेल्या तीन ते चार दिवसापासून राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane), रायगड या भागात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, वाढत्या पावसाचा शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मुंबईकरांनो सावधान! केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र, पुढील 3 दिवस राज्यात कोसळणार जोरदार पाऊस