मुंबई: एकीकडे लातूरला रेल्वेनं पाणी देण्याची सर्कस सुरु असताना लातूरकरांवर हात पसरण्याची वेळ राज्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनीच आणल्याचं समोर आलं आहे. भीषण पाणीटंचाईच्या काळातही पिण्याचं पाणी लातूर जिल्ह्यातील 12 ते 14 साखर कारखान्यांना दिल्यानंच लातूरकरांना दाहीदिशा फिरावं लागल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी मान्य केलं आहे.

 

लातूरच्या पाणीप्रश्नावर आज त्यांनी विधीमंडळात निवेदन दिलं. यावेळी त्यांनी लातूरचे उद्योग अंशत: बंद झाले असून 3 हजारावर कामगार बेरोजगार झाल्याचं मान्य केलं. बेरोजगार झालेल्या कामगारांना स्वस्त रेशन देण्याचीही घोषणा देसाई यांनी केली

 

'पाणी टंचाई असताना 12 ते 14 साखर कारखान्यांना पाणी दिलं. त्यामुळे नियोजन चुकले. त्याचाच परिणाम इतर उद्योगांवर झाला. टंचाईच्या काळात पाणी कारखान्यांना द्यायला नको होतं. यापुढे हे होणार नाही. याची काळजी सरकार यापुढे घेईल. ' असं म्हणत देसाई यांनी भाजपच्या हातात असलेल्या महसूल, कृषी आणि सहकार मंत्र्यांवर निशाणा साधला.